मुंबई : जगभरातील ट्वेन्टी-२० लीगची वाढती संख्या आणि फ्रँचायझी क्रिकेटचा वाढता प्रभाव यामुळे भविष्यात द्विपक्षीय एकदिवसीय मालिकांची संख्या कमी होऊ शकते. मात्र, ५०-५० षटकांच्या प्रारूपाविना क्रिकेटची कल्पना करणेही अवघड आहे, असे वक्तव्य दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी र्होड्सने केले.युरोपीय ट्वेन्टी-२० प्रीमियर लीगमधील (इटीपीएल) रॉटरडॅम डॉकर्स संघाच्या जर्सीचे मंगळवारी मुंबईत अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला रॉटरडॅम संघाचे सह-मालक जॉन्टी र्होड्स आणि अभिनेता जॉन अब्राहम उपस्थित होते.जर्सी अनावरण कार्यक्रमानंतर जॉन्टीने माध्यमांशी संवाद साधताना क्रिकेटच्या भवितव्यावर भाष्य केले. ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेट सुरू झाले तेव्हा त्याचा कसोटीवर परिणाम होईल, असे म्हटले जात होते. मात्र, तसे झाले नाही. उलट, काही कसोटी सामन्यांमध्ये ट्वेन्टी-२० सारखा आक्रमक खेळ पाहायला मिळतो.
एकदिवसीय क्रिकेट कदाचित अडचणीत येऊ शकते, कारण त्यासाठी नव्या आणि वेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना आकर्षित करावे लागते. आगामी काळात द्विपक्षीय मालिकांची संख्या कमी होऊ शकते. मात्र, एकदिवसीय प्रारूपाविना क्रिकेटची कल्पना करणेही अवघड आहे,’’ असे जॉन्टी म्हणाला.
