इराणने आपल्या महिला राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये गोलकीपर म्हणून एका पुरुषाला खेळवल्याचा आरोप करण्यात येत आहे. इराणविरोधात सामना खेळणाऱ्या जॉर्डनने हा आरोप केला आहे. आता या प्रकरणामध्ये जॉर्डन फुटबॉल असोसिएशनने आशिया फुटबॉल समितीकडे (एएफसी) इराणच्या संघातील खेळाडूंची लिंग चाचणी आणि डोपिंग चाचणी करण्याची मागणी केलीय. यासंदर्भात जॉर्डनने एक पत्रही एएफसीला पाठवलं आहे.

जॉर्डन फुटबॉल असोसिएशनने आपल्या पत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार २५ सप्टेंबर रोजी इराण आणि जॉर्डनदरम्यान महिला आशिया कप पात्रताफेरीचा सामना झाला होता. या सामन्यामध्ये इराणच्या संघामध्ये असणाऱ्या खेळाडूंच्या लैंगिकतेसंदर्भातील चाचणी करण्याची मागणी जॉर्डनने केलीय. याचसंदर्भातील एक पत्र जॉर्डन फुटबॉल असोसिएशनचे अधिकारी अली बिन अल हुसैन यांनी ट्विटरवरुन शेअर केलंय.

पुरावे आणि या दोन्ही देशांमध्ये महिलांसाठी असणारे फुटबॉलचे महत्व लक्षात घेऊन या प्रकरणामध्ये सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी जॉर्डन फुटबॉल असोसिएशने केलीय. ज्या गोलकीपरसंदर्भात शंका घेण्यात आलीय तिचं नाव जोहऱ्हे कुदै असं आहे.

इराणणने २०२२ एएफसी महिला आशिया कपमध्ये तजाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साखळी सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये जॉर्डनला ४-२ ने पराभूत केलं होतं. आता जॉर्डनने याच सामन्यामधील इराणकडून गोलकिपींग करणारी व्यक्ती महिला नसून पुरुष असल्याचा दावा केलाय.