Jos Buttler On Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडचा स्टार फलंदाज जोस बटलरचा टी-२० क्रिकेटमध्ये बोलबाला पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत ख्रिस गेल आणि कायरन पोलार्डसारख्या स्फोटक फलंदाजांनी टी-२० क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं होतं. आता जोस बटलरने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. बटलर हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने गेल आणि पोलार्डला मागे टाकलं आहे. दरम्यान हा रेकॉर्ड मोडल्यानंतर अशा एका भारतीय खेळाडूचं नाव सांगितलं आहे, जो भविष्यात हा रेकॉर्ड मोडून काढू शकतो.
बटलरने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहासाला गवसणी घातली आहे. द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. वेल्श फायर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना बटलरने अवघ्या २० चेंडूंमध्ये ५१ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १४८३३ धावा पूर्ण केल्या आहेत.
याआधी हा रेकॉर्ड कायरन पोलार्डच्या नावावर होता. पोलार्डच्या नावे १४८०३ धावा करण्याची नोंद आहे. तर ख्रिस गेलच्या नावे १४५६२ धावा करण्याची नोंद आहे. बटलरने ५२२ व्या टी-२० सामन्यात हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यादरम्यान त्याने ९ शतकं आणि २० अर्धशतकं झळकावली आहेत. हा रेकॉर्ड आपल्या नावावर केल्यानंतर त्याने लक्षवेधी विधान केलं आहे. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “खूप चांगलं वाटतंय, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर आहे. कधी ना कधी कोणीतरी हा रेकॉर्ड मोडेल. कदाचित त्याचं नाव वैभव सूर्यवंशी असेल. पण सध्या तरी हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे.”
तसेच आपल्या फॉर्मबद्दल बोलताना बटलर म्हणाला, “क्रिकेट हा असा खेळ आहे जो खूप वेगाने बदलतो. काही महिन्यांपूर्वी मी फलंदाजीत संघर्ष करत होतो. पण गेल्या काही आठवड्यातील कामगिरी पाहिली, तर मला जाणवत आहे की, मी माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाजी करत आहे. अशा स्थितीत आपल्या समोर २ पर्याय असतात, हार मानायची किंवा ताकदीने पुनरागमन करायचं.मी दुसरा मार्ग निवडला आणि त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले.”
