Jos Buttler Dance Video: द हंड्रेड लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना ट्रेंट रॉकेट्स आणि मँचेस्टर सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात संजीव गोयंका यांच्या मालकिचा मँचेस्टर सुपर जायंट्स संघाने अंतिम सामन्यात ट्रेंट रॉकेट्स संघाचा धुव्वा उडवला आणि पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला. मँचेस्टर सुपर जायंट्स संघाने आजवर जेतेपदाचा मान पटकावला नव्हता. पण जोस बटलरच्या नेतृत्वात मँचेस्टर सुपर जायंट्सने इतिहास घडवला. या विजयानंतर मँचेस्टर सुपर जायंट्स संघातील खेळाडू जोरदार जल्लोष करताना दिसून आले. यादरम्यान जोस बटलरने ट्रॉफीसोबत केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
द हंड्रेड लीग स्पर्धेतील अंतिम सामना १६ ऑगस्टला ट्रेंट रॉकेट्स आणि मँचेस्टर सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघ या स्पर्धेतील बलाढ्य संघांपैकी एक होते. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये थरारक सामना पाहायला मिळण्याची शक्यता आधीपासूनच होती. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ट्रेंट रॉकेट्स संघाने १०० चेंडूंमध्ये १५८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मँचेस्टर सुपर जायंट्स संघाकडून टीम सेफर्टने ३८ चेंडूंमध्ये ७२ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर सेफर्टने मँचेस्टर सुपर जायंट्स संघाच्या विजयाचा पाया रचला. या खेळीदरम्यान त्याने ७ षटकार आणि ४ चौकार खेचले. त्यानंतर लयूस डी प्लॉय आणि जोस बटलरने मँचेस्टर सुपर जायंट्स संघाला विजय मिळवून दिला.
जोस बटलरचा भन्नाट डान्स
जोस बटलर आपल्या शांत स्वभावासाठी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. फलंदाजी करत असताना त्याने गोलंदाजांची धुलाई केल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण त्याला मैदानावर गोंधळ घालताना तुम्ही आजवर पाहिलं नसेल. पण, द हंड्रेड लीग स्पर्धेतील अंतिम सामना जिंकल्यानंतर त्याने भांगडा डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संजीव गोयंका यांच्या मालकिच्या मँचेस्टर सुपर जायंट्स संघाने पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला आहे. २०२६ चे हंगाम सुरु होण्याआधी ते या संघाचे मालक बनले होते. याआधी या संघाचं नाव मँचेस्टर ओरिजिनल्स असं होतं. २०२२ आणि २०२३ मध्ये झालेल्या हंगामात या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण या संघाला जेतेपदाचा मान पटकावता आला नव्हता. अखेर २०२६ मध्ये मँचेस्टर सुपर जायंट्स संघाने पहिल्यांदाच जेचेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. त्यामुळे खेळाडूंनी विजयाचा जोरदार जल्लोष केला.
