Jos Buttler Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने दमदार शतकी खेळी केली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. या आमंत्रणाचा स्वीकार करून इंग्लंडने २० षटकांअखेर २५७ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान शतकी खेळी करणाऱ्या जोस बटलरच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीला मागे टाकलं आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना जोस बटलरने ५१ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने ६४ चेंडूचा सामना करत १३१ धावांची खेळी केली. त्याने कर्णधार हरी ब्रूकसोबत मिळून विक्रमी २३३ धावांची भागीदारी केली. यादरम्यान ब्रूकने नाबाद ९५ धावांची खेळी केली. या विक्रमी भागीदारीच्या बळावर इंग्लंडने ३ गडी बाद २५७ धावांपर्यंत मजल मारली.
जोस बटलर या खेळीसह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. विराट कोहलीने आपल्या टी-२० कारकिर्दीत १२५ सामन्यांमध्ये ४१८८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३८ अर्धशतकं झळकावली आहेत. तर बटलरने या शतकी खेळीसह विराट कोहलीला मागे टाकलं आहे. बटलरने आतापर्यंत १६० सामन्यांमध्ये ४२१२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतकं आणि २८ अर्धशतकं झळकावली आहेत. या सामन्यात जेव्हा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला, त्यावेळी त्याला १०८ धावांची गरज होती. त्याने १३१ धावांची खेळी करून हा रेकॉर्ड मोडून काढला.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर आहे. बाबरच्या नावावर १४५ सामन्यांमध्ये ४५९६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि ३९ धावा केल्या आहेत. तर भारताचा माजी फलंदाज रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्माने १५९ सामन्यांमध्ये ४२३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितने ५ शतकं आणि ३२ अर्धशतकं झळकावली आहेत. विराट आणि रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे बटलरकडे रोहित आणि बाबर आझमचाही रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे
