जोस बटलरने मोडला विराटचा ‘हा’ विक्रम, आयपीएल शतकांच्या विक्रमाशीही केली बरोबरी

आपल्या जबरदस्त फॉर्मच्या बळावर जोस बटलरने क्लॉलिफायर २ सामन्यात विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे.

जोस बटलर
विराट कोहली आणि जोस बटलर

राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२च्या क्वॉलिफायर २ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थानने दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. शतकवीर जोस बटलर राजस्थानच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने नाबाद १०६ धावा करून बंगळुरूविरुद्ध शतक झळकावले. हे त्याचे या हंगामातील चौथे शतक ठरले आहे. काल झालेल्या सामन्यात बटलरने विराट कोहलीच्या एका विक्रमाची बरोबरी केली तर एक विक्रम मोडीत काढला.

राजस्थानचा सलामीवर जोस बटलर आयपीएलच्या या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चार शतके आणि चार अर्धशतकांसह त्याने १६ सामन्यांमध्ये १५१च्या स्ट्राइक रेटने ८२४ धावा फटकावल्या आहेत. आपल्या जबरदस्त फॉर्मच्या बळावर त्याने क्लॉलिफायर २ सामन्यात विराट कोहलीचा एका हंगामात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम मोडला आहे. बटलरने आयपीएल २०२२ मध्ये १२४ वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवला आहे. यामध्ये ७८ चौकार आणि ४५ षटकारांचा सामवेश आहे. विराट कोहलीने आयपीएल २०१६ मध्ये अशी कामगिरी केली होती. विराटने ८३ चौकार आणि ३८ षटकारांच्या मदतीने १२२ वेळा चेंडू सीमारेषेपार पोहचवला होता. बटलरने कोहलीचा हाच विक्रम मोडला आहे.

याशिवाय, जोस बटलरने कोहलीच्या आणखी एका विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये बटलरने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. बटलरच्या नावे आता आयपीएलमध्ये पाच शतकांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी चार तर याच हंगामातील आहेत. विराट कोहलीच्या नावावरही पाच आयपीएल शतकांची नोंद आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये सहा शतके ठोकलेली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jos buttler breaks virat kohlis record for hitting most boundaries in a ipl season vkk

Next Story
आई आजारी असूनही संघासाठी खेळत राहिला राजस्थानचा ‘हा’ खेळाडू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी