Jos Buttler Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १४ वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सने २० षटकांअखेर ४ गडी बाद २०४ धावा केल्या. गुजरातकडून जोस बटलरने ५२ धावांची दमदार खेळी केली. यासह त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये सुरेश रैनाच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

गुजरात टायटन्सने २०२५ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये जोस बटलरला १५.७५ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. या हंगामातही तो गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी केली. या डावात फलंदाजी करताना त्याने २७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले. हे पाचही षटकार त्याने सुरुवातीच्या ६ षटकांच्या आत खेचले.

या ५ षटकारांसह त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जोस बटलर हा आयपीएलमध्ये सलामीला फलंदाजीला न येता, सुरुवातीच्या ६ षटकात ५ षटकार खेचणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना अव्वल स्थानी आहे. सुरेश रैनाने चेन्नईकडून फलंदाजी करताना सुरुवातीच्या ६ षटकात सर्वाधिक ६ षटकार खेचले होते. २०१४ मध्ये पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने सुरुवातीच्या ६ षटकात ६ षटकार खेचले होते. यासह हा मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.

गुजरात टायटन्सने उभारला २१० धावांचा डोंगर

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. साई सुदर्शन अवघ्या १२ धावा करून माघारी परतला. त्यानंतर शुबमन गिलने जोस बटलरसोबत मिळून संघाचा डाव सांभाळला. बटलरने २७ चेंडूत ५२ धावा केल्या. तर शुबमन गिलने ४५ चेंडूत ७० धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने ३२ चेंडूत ५५ धावा केल्या. शेवटी ग्लेन फिलिप्स ९ चेंडूत १४ धावांवर नाबाद राहिला. यासह गुजरातने ४ गडी बाद २१० धावा केल्या.