Jos Buttler Biggest T20 Record: आज ८ एप्रिलला आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. दिल्लीच्या घरच्या मैदानावरील सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २१० धावांचा डोंगर उभारला आहे. गुजरातच्या या मोठ्या धावसंख्येच्या पाया जोस बटलरने रचला. बटलर या सामन्यात वादळी फॉर्मात दिसत होता आणि झटपट त्याने अर्धशतक झळकावत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
गुजरात टायटन्सने सावध सुरूवात केल्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनच्या रूपाने गुजरात टायटन्सने आपली पहिली विकेट गमावली. यानंतर जोस बटलर फलंदाजीला उतरला. मैदानावर आल्यावर जोस बटलरने केवळ डाव सावरला नाही, तर २७ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि पाच षटकारांसह धावांचा पाऊस पाडला. जो यापूर्वी टी-२० फॉरमॅटमध्ये इंग्लंडच्या इतर कोणत्याही खेळाडूने केला नव्हता.
जोस बटलर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याच्या नावावर ५९५ षटकारांसह टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम होता. डावातील आपल्या पहिल्याच षटकाराने त्याने ॲलेक्स हेल्सला मागे टाकत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा इंग्लिश खेळाडू बनण्याचा मान मिळवला. यासोबतच, त्याने आपल्या खेळीत आणखी चार षटकार मारून ६०० षटकारांचा टप्पा गाठला.
ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि निकोलस पूरन यांच्या यादीत आता जोस बटलर टी-२० क्रिकेटमध्ये ६०० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा केवळ पाचवा खेळाडू ठरला आहे. जोस बटलरने आतापर्यंत टी-२० फॉरमॅटमध्ये एकूण ४९६ सामने खेळले असून, त्यामध्ये त्याने ४६७ डावांत फलंदाजी करताना ३४.९८ च्या सरासरीने १३,९६१ धावा केल्या आहेत आणि ६०० षटकार लगावले आहेत. यासह टी-२० क्रिकेटमध्ये ६०० षटकार मारणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – १०५६ षटकार
किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) – ९८२ षटकार
आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज) – ७८४ षटकार
निकोलस पूरन (वेस्ट इंडिज) – ७१२ षटकार
जोस बटलर (इंग्लंड) – ६०० षटकार
जोस बटलरला टी-२० फॉरमॅटमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे. १४ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो इंग्लंडचा दुसरा आणि जागतिक क्रिकेटमधील केवळ पाचवा खेळाडू ठरू शकतो. सध्या टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर आहे.
