Jos Buttler Creates History for England: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडचा १६ धावांनी पराभव करून मालिकेत आपला पहिला विजय नोंदवला. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरने शानदार अर्धशतक झळकावलं. या अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने ऐतिहासिक कामगिरी करत इंग्लंडसाठी आजवर कोणीही न करू शकलेला विक्रम केला आहे.
श्रीलंका संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजलं. श्रीलंकेने हेडिंग्लेच्या मैदानावर यजमान संघाचा १६ धावांनी पराभव केला. कुसल मेंडिसच्या शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांचा डोंगर उभारला. तर इंग्लिश संघ प्रत्युत्तरात ३०५ धावाच करू शकला. चांगल्या सुरूवातीनंतर जोस बटलरने संघाचा डाव पुढे नेला, पण त्याला अचानक झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो रिटायर्ड हर्ट होत माघारी परतला आणि त्यानंतर इंग्लंडचा डाव पूर्णपणे कोसळला.
रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी जोस अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीदरम्यान बटलरने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला; त्याने ‘व्हाइट-बॉल’ क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच इंग्लिश फलंदाज ठरला. यापूर्वी कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला हा विक्रम साधता आला नव्हता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये, जोस बटलरने २०४ सामन्यांमधील १७६ डावांत ५,६७८ धावा केल्या आहेत; यात त्याची सरासरी सुमारे ३९ आणि स्ट्राईक रेट ११५ पेक्षा अधिक (जो अत्यंत प्रभावी आहे) राहिला आहे. यादरम्यान त्याने ११ शतकं आणि ३० अर्धशतकं झळकावली असून, नाबाद १६२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.
तर बटलर हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी फलंदाज असून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर आहे. त्याने १६३ सामन्यांमधील १५० डावांत एकूण ४,३८४ धावा केल्या आहेत; यात दोन शतकं आणि ३० अर्धशतकांचा समावेश असून त्याची सरासरी जवळपास ३५ आणि स्ट्राईक रेट १५० इतका जबरदस्त आहे. शिवाय, जोस बटलरने एकंदरीत ‘व्हाईट-बॉल’ क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे; त्याने आतापर्यंत ३६७ सामन्यांमधील ३२६ डावांत ३७ पेक्षा जास्त सरासरीने १०,०६२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १३ शतकं आणि ६० अर्धशतकं आहेत.
