इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ ही टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आता शेवटाकडे आली आहे. येत्या रविवारी म्हणजे २९ मे रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाईल. अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील. क्वॉलिफायर १ सामना जिंकून गुजरात टायटन्सने सर्वात अगोदर अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर, काल (२७ मे) झालेल्या क्वॉलिफायर २ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून राजस्थान रॉयल्सही अंतिम फेरीत दाखल झाले आहे. तब्बल १४ वर्षांच्या अंतरानंतर राजस्थानचा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाच्या जवळ पोहचला आहे. राजस्थानच्या या विजयामध्ये जोस बटलरने शिल्पकाराची भूमिका निभावली. जोस बटलरने आपली निर्णायक शतकी खेळी एका अतिशय खास व्यक्तीला अर्पण केली आहे. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून राजस्थान रॉयल्स संघाचा सर्वात पहिला कर्णधार शेन वॉर्न आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी रात्री क्वॉलिफायर २ मध्ये फाफ डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. या शानदार विजयाच्या जोरावर राजस्थानच्या संघाने १४ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने अंतिम फेरी गाठून विजेतेपद पटकावले होते. क्वॉलिफायर २ सामन्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांना या गोष्टीची आठवण झाली. दोघेही शेन वॉर्नच्या आठवणीमध्ये थोडेसे भावूक झालेले दिसले.

जोस बटलरने आरसीबीविरुद्ध शतकी खेळी केली. त्याने आपली ही खेळी राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार आणि दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्नला अर्पण केली. सामन्यानंतर जोस बटलर म्हणाला, “शेन वॉर्न राजस्थान रॉयल्ससाठी खूप प्रभावशाली व्यक्ती आहे. आज तो आमच्याकडे अत्यंत अभिमानाने बघत असेल”.

४ मार्च २०२२ रोजी ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्न हा असा गोलंदाज होता ज्याने एकेकाळी आपल्या मनगटाच्या जादूने जगातील दिग्गज फलंदाजांच्या मनात धाक निर्माण केला होता. प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या शेन वॉर्नला राजस्थान रॉयल्सच्या संघमालकांनी आयपीएलच्या पहिल्या हंगामात कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. वॉर्नने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याने काही काळ राजस्थानच्या संघाचा प्रशिक्षक आणि सल्लागार म्हणून काम केले होते. त्यामुळे राजस्थानच्या संघातील सर्व खेळाडूंच्या मनात शेन वॉर्नबद्दल नितांत आदर आहे.