IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाची टी-२० मालिकेतील खराब कामगिरी सातत्याने सुरू आहे. आता अखेरच्या टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत इंग्लंड संघाने २५७ धावांचा डोंगर उभारला आहे. या खेळीमध्ये जोस बटलर व हॅरी ब्रुकच्या भागीदारीचं मोठं योगदान आहे. बटलरने शतकी खेळी साकारली तर ब्रुकने बटलरचा चांगली साथ देत धावांचा पाऊस पाडला. यासह या दोघांनी २३३ धावांची भागीदारी रचत मोठा विक्रम आपल्या नावे केला.

साऊथम्पॅटनच्या स्टेडियममध्ये मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडसाठी फलंदाजी करताना जोस बटलरने ५१ चेंडूत शतक पूर्ण केलं. बटलरने तब्बल पाच वर्षांनंतर हे शतक झळकावलं आहे. या सामन्यापूर्वी बटलरसाठी ही मालिका फारशी चांगली राहिली नव्हती; कारण तीन डावांत त्याला केवळ ४४ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे, भारतीय संघाप्रमाणेच बटलरसाठीही हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. योगायोगाने, बटलरचा हा १६० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना ठरला आणि यासह या प्रकारात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला.

जोस बटलर-हॅरी ब्रूकचा वर्ल्ड रेकॉर्ड

जोस बटलरने कर्णधार हॅरी ब्रूकसोबत दुसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची भागीदारी केली, जी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पूर्ण सदस्य देशांच्या बाबतीत कोणत्याही विकेटसाठी झालेली सर्वोच्च भागीदारी ठरली. योगायोगाने, त्याने भारताच्या तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांच्या नावावर असलेला २१० धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला.

इंग्लंडच्या या सर्वात यशस्वी टी-२० फलंदाजाने शतकी खेळी करत हा टप्पा गाठला. बटलरचा सलामीचा जोडीदार फिल सॉल्ट लवकर बाद झाल्यानंतर बटलरने हॅरी ब्रुकसह संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत संघाला नेलं. बटलरने भारतीय गोलंदाजांविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यानंतर त्याला रोखणं कठीण झालं; त्याने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं, मात्र पुढील ५० धावा त्याने अगदी निम्म्या चेंडूंमध्ये १७ चेंडूंत फटकावल्या.

बटलरने ५१ चेंडूंत आपलं शतक पूर्ण केलं. १६ व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर षटकार मारून त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा टप्पा गाठला. शतक पूर्ण करेपर्यंत बटलरने ९ चौकार आणि ६ षटकार लगावले होते. तर बटलरने या सामन्यात ६४ चेंडूत १२ चौकार व ८ षटकारांसह १३१ धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर इंग्लंडने एकूण २५७ धावांचा डोंगर उभारला.