Sri Lanka Defeat England 2nd ODI Headingley Match: श्रीलंकेच्या संघाने इंग्लंड संघावर त्यांच्या घरच्या मैदानावरच १६ धावांनी रोमांचक विजय मिळवला. एका दुखापतीचा मोठा फटका इंग्लंडला बसला आणि त्यांना थेट पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांचा मोठा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ९ बाद ३०५ धावा करत बाद झाला. एका दुखापतीमुळे सामना कसा पालटला आणि श्रीलंकेने कसा विजय मिळवला, पाहूया.

श्रीलंकेचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने जिंकत १-० अशी आघाडी मिळवली आहे. तर पुढील दोन सामन्यांमध्ये इंग्लंडच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या दौऱ्यात श्रीलंकेला सलग चार पराभव पत्करावे लागले होते, यात तीन टी-२० सामने आणि त्यानंतरच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याचा समावेश होता. यापूर्वी इंग्लंडला हेडिंग्लेवर सलग चार एकदिवसीय सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता; मात्र यावेळी, खुद्द कर्णधार कुसल मेंडिसने झळकावलेल्या शानदार शतकाच्या बळावर, त्याच्या नेतृत्वाखालील संघाने या दौऱ्यातील आपला पहिला विजय अखेर साकारला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कुसल मेंडिसने अवघ्या १०० चेंडूंत १२१ धावांची (१४ चौकार आणि ३ षटकारांसह) शानदार खेळी केली आणि श्रीलंकेला ३२१ धावांची भक्कम धावसंख्या गाठून दिली. मेंडिसच्या कारकिर्दीतील हे सातवं एकदिवसीय शतक होतं; तसेच ऑक्टोबर २०२३ नंतर श्रीलंकेबाहेर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्याला कामिंदू मेंडिस (५४) आणि पवन रत्नायके (४८) यांची मोलाची साथ लाभली, तर जनिथ लियानागेनेही (३२) जलद गतीने धावा करत श्रीलंकेला या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत केली. इंग्लंडतर्फे गस ॲटकिन्सन आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

इंग्लंड संघाची सुरूवात दणक्यात झाली होती, त्यामुळे इंग्लंडचा या सामन्यात पराभव होईल अशी शक्यता फार कमी होती. टॉम बँटन (७३) आणि बेन डकेट (६७) यांनी स्फोटक सुरुवात करत अवघ्या २० षटकांत १४० हून अधिक धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतरच्या ६० धावांच्या दरम्यान चार फलंदाज ज्यामध्ये दोन्ही सलामीवीर आणि चांगल्या लयीत असलेला जो रूट बाद झाले. युवा फिरकीपटू दुनिथ वेलालागेने यापैकी तीन बळी टिपले. दरम्यान, जोस बटलरने आपला आक्रमक पवित्रा कायम राखत अवघ्या ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं.

बटलर क्रीझवर होता, तोपर्यंत इंग्लंड विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत होतं. पण मग असा एक क्षण आला ज्याने सामना फिरवला. ३८ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूनंतर, दुखापतीमुळे बटलरला मैदान सोडावं लागलं. त्या वेळी इंग्लंडची धावसंख्या ४ बाद २५४ अशी होती. त्यांना उर्वरित १२.३ षटकांत—म्हणजेच ७५ चेंडूंमध्ये ६६ धावांची गरज होती. मात्र, त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी असा काही सापळा रचला की त्यात इंग्लंडचे फलंदाज एकापाठोपाठ एक अडकत गेले.

बटलर ४९ व्या षटकात पुन्हा फलंदाजीसाठी उतरला, पण तोही संघाला सावरू शकला नाही आणि इंग्लंडला ५० षटकांत केवळ ३०५ धावांची मजल मारता आली. या १२.३ षटकांच्या कालावधीत इंग्लंडच्या फलंदाजांना केवळ दोनच चौकार मारता आले.