Jos Buttler On Gujarat Titans Bus Incident: आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ५ गडी राखून विजय मिळवला. यासह दुसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. एकीकडे उत्साहाचं वातावरण होतं, तर दुसरीकडे गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना भयानक अनुभव आला. स्टेडियममधून खेळाडूंना हॉटेलमध्ये घेऊन जात असलेल्या बसला अचानक आग लागली. त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत जोस बटलरने मोठा खुलासा केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या पराभवानंतर गुजरातचे खेळाडू रविवारी रात्री उशीरा हॉटेलच्या दिशेने रवाना झाला. त्यावेळी, ज्या बसने खेळाडू प्रवास करत होते, त्या बसमध्ये शॉर्ट सर्किट झालं. बसमधून धूर येऊ लागला. त्यामुळे सर्व खेळाडूंना बसच्या बाहेर यावं लागलं. दुसऱ्या बसची व्यवस्था होईपर्यंत खेळाडूंना तिथेच वाट पाहत उभं राहावं लागलं. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही खेळाडूला इजा झाली नाही.
इंग्लंडचा माजी कर्णधार आणि गुजरात टायटन्सचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने त्या रात्री बसमध्ये नेमकं काय घडलं, याबाबत खुलासा केला आहे. स्टुअर्ट ब्रॉडसोबत एका पॉडकास्टमध्ये बोलताना बटलर म्हणाला, “गुजरात टायटन्ससाठी ती रात्र वाईट स्वप्नाहून कमी नव्हती. एकीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे खेळाडू जल्लोष करण्यात व्यस्त होते, तर दुसरीकडे शॉर्ट सर्किटमुळे आमच्या टीम बसमधून धूर निघू लागल्याने खेळाडूंना तातडीने खाली उतरावे लागले होते. हे खूप निराशाजनक आहे, यातून सावरण्यासाठी आम्हाला वेळ लागेल.”
गुजरात टायटन्सने क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. पण अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. सामना झाल्यानंतर कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला, याबाबत बोलताना बटलर म्हणाला, “शुबमन गिलने सामना झाल्यानंतर चुका समजावून सांगितल्या. जर १८०-१९० धावा केल्या असत्या तर सामना बरोबरीत राहिला असता. खेळपट्टीतून वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. पण दुसऱ्या डावात फलंदाजी करणं आणखी सोपं झालं.” पावरप्लेमध्ये १-२ गडी बाद केले असते, तर सामन्यात टिकून राहिलो असतो, असं गिल म्हणाला.
