Jos Buttler World Record in T20 Cricket: टी-२० क्रिकेट इतिहासात जोस बटलरने आपलं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं आहे. या आधुनिक टी-२० क्रिकेट फॉरमॅटचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अफाट ताकदीने गोलंदाजांवर तुटून पडणारे किंवा अप्रतिम कौशल्याने डाव सावरणारे फलंदाज नक्कीच चर्चेत असतील. मात्र शांत आणि संयमाने सातत्यपूर्ण, अत्यंत प्रभावी पद्धतीने कामगिरी करत जोस बटलरने आता विक्रमांच्या पुस्तकात आपलं नाव नोंदवलं आहे. जोस बटलरने कायरन पोलार्डला मागे टाकत मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
इंग्लंडचा हा स्टार फलंदाज जोस बटलर सध्या द हंड्रेड स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत बटरल मँचेस्टर सुपर जायंट्स संघाकडून खेळताना धावांचा पाऊस पाडत आहे. याशिवाय आज ६ ऑगस्टला झालेल्या सामन्यात जोस बटलरने वादळी अर्धशतकी खेळी करत त्याने मोठ्या विक्रमाची आपल्या नावे नोंद केली. या सामन्यापूर्वी, कायरन पोलार्डचा विश्वविक्रम मोडण्यासाठी जोस बटलरला २२ धावांची गरज होती. त्याने षटकार मारून ही कामगिरी आपल्या नावे केली.
जोस बटलरने टी-२०मध्ये इतिहास घडवला!
जोस बटलरने आतापर्यंत ५२२ टी-२० सामन्यांमध्ये १४,८३३ धावा केल्या आहेत, यासह बटलर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. जोस बटलर आता टी-२० इतिहासात सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या यादीत कायरन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर असून, त्याने ७४६ सामन्यांत १४,८०३ धावा केल्या आहेत.
टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावर आहे; त्याने ४६३ सामन्यांत १४,५६२ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा ॲलेक्स हेल्स चौथ्या स्थानावर असून, त्याने ५२८ सामन्यांत १४,४४९ धावा केल्या आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे; त्याने ५२८ सामन्यांत १४,२८४ धावा केल्या आहेत.
टी-२० क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
जोस बटलर – १४८३३* धावा
कायरन पोलार्ड – १४८०३ धावा
ख्रिस गेल – १४५६२ धावा
अॅलेक्स हेल्स – १४४९८ धावा
बटलरच्या संघाचा द हंड्रेड सामन्यात दणदणीत विजय
वेल्श फायर आणि मँचेस्टर सुपरचार्जर्स यांच्यातील सामन्यात, कर्णधार बटलरच्या नेतृत्वाखाली मँचेस्टरने नऊ गडी राखून विजय मिळवला. संघाचा नियमित कर्णधार एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेला परतल्याने नेतृत्त्वाची जबाबदारी बटलरला देण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना वेल्श फायरने १०० चेंडूंमध्ये ४ गडी गमावून १५५ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून, मँचेस्टरने ६९ चेंडूंमध्ये १६१ धावा करत विजय आपल्या नावे केला. मँचेस्टरसाठी टिम सायफर्टने ३६ चेंडूंत ६० धावा केल्या, तर बटलरने २० चेंडूंत ५१ धावांची खेळी केली; यात त्याने दोन चौकार आणि सहा षटकार लगावले. सायफर्ट आणि बटलर दोघेही नाबाद राहिले.
