Josh Hazlewood Final Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दबदबा पहायला मिळाला. आधी गोलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना कमी धावांवर रोखलं. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने नाबाद अर्धशतकी खेळी केली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला लागोपाठ दुसरी ट्रॉफी जिंकून दिली. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडनेही दमदार गोलंदाजी केली. दरम्यान हा सामना जिंकताच जोश हेझलवूडच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे, जो आजवर कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाही.
अंतिम सामन्यात जोश हेझलवूड ज्या संघात आहे, त्या संघाचं नशीब चांगलं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण जोश हेझलवूड आतापर्यंत ३ वेळा आयपीएलची फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे आणि तिन्ही वेळेस त्या संघाने जेतेपद पटकावलं आहे, ज्या संघात जोश हेझलवूड आहे.
गेल्या हंगामातही जोश हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला होता. त्याआधी २०२१ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. या सामन्यातही चेन्नई सुपर किंग्सने जेतेपदाचा मान पटकावला होता. आता गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवून दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावली आहे. हा जोश हेझलवूडचा तिसरा विजय ठरला आहे.
जोश हेझलवूडची अंतिम सामन्यात विक्रमी कामगिरी
त्याचा हा रेकॉर्ड आयपीएल स्पर्धेपुर्ती मर्यादित नाही. तर आतापर्यंत तो व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जितके अंतिम सामने खेळण्यासाठी उतरला आहे, ते सर्व सामने हेझलवूडच्या संघाने जिंकले आहेत. २०१२ मध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळताना वनडे वर्ल्डकप, २०२० बिग बॅश लीगमध्ये खेळताना सिडनी सिक्सर्सकडून जेतेपद, २०२१ मध्ये वनडे कप, २०२१ मध्ये चेन्नईकडून खेळताना जेतेपद, २०२३ वनडे वर्ल्डकप विजय, २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना विजय आणि आता पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना. जोश हेझलवूड जितक्या वेळा व्हाईट बॉल क्रिकेटची फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे, ते सर्व सामने त्याच्या संघाने जिंकले आहेत. हा अविश्वसनीय रेकॉर्ड आहे.
