वृत्तसंस्था, ब्रिस्बेन

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या ॲशेस मालिकेतील उर्वरित तीन कसोटी क्रिकेट सामन्यांनाही मुकणार आहे. मात्र, कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीतून सावरला असून पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

हेझलवूड दुखपतीमुळे पर्थ आणि ब्रिस्बेन येथे झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकला नव्हता. तो उर्वरित सामन्यांत खेळण्याबाबत ऑस्ट्रेलियाचा संघ आशावादी होता. मात्र, त्याला नव्याने दुखापत झाल्याने तो आता संपूर्ण मालिकेलाच मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्रयू मॅकडॉनल्ड यांच्या माहितीनुसार हेझलवूड पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. ‘‘हेझलवूड ॲशेस मालिकेत खेळू शकणार नाही. तो काही काळाने विश्वचषकाच्या दृष्टीने तयारीला सुरुवात करेल. ही स्पर्धा आमच्या संघासाठी अतिशय महत्त्वाची आहे,’’ असे मॅकडॉनल्ड म्हणाले.

हेझलवूडप्रमाणेच कमिन्सही पहिल्या दोन कसोटीत खेळू शकला नव्हता. मात्र, १७ डिसेंबरपासून ॲडलेड येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे. ब्रिस्बेन येथे दुसऱ्या कसोटीच्या वेळी कमिन्स सराव करत होता. तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा बुधवार होणार असून कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा कमिन्सकडे सोपविण्यात येईल. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करीत होता. ऑस्ट्रेलियाने पहिले दोनही सामने जिंकत पाच सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न (२६-३० डिसेंबर) आणि पाचवा सामना सिडनी (४-८ जानेवारी २०२६) येथे रंगणार आहे. इंग्लंडने २०१०-११ नंतर ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस मालिका जिंकलेली नाही.

मार्क वूडही जायबंदी

ॲशेस मालिकेतील पहिले दोन सामने गमाविणाऱ्या इंग्लंड संघाला ॲडलेड कसोटीपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. वूड मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला होता. मात्र, त्याला प्रभाव पाडता आला नव्हता. पायाच्या दुखापतीमुळे त्याला ब्रिस्बेन कसोटी खेळता आली नाही. मालिकेपूर्वीच त्याची तंदुरुस्तीबाबत चर्चा सुरू होती. मार्चमध्ये गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याने पुनरागमन केले होते. परंतु तो पुन्हा जायबंदी झाला आहे. त्याच्या जागी मॅट फिशरला इंग्लंड संघात स्थान देण्यात आले आहे. फिशरने २०२२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्याला या एकमेव सामन्याचा अनुभव असून त्याने एक बळी मिळवला आहे.