भारताच्या जोश्ना चिनप्पाने कॅनडातील विनिपेग विंटर क्लब स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत जोश्नाने इजिप्तच्या हेबा इल टर्कीवर ११-१३, ११-८, ११-५, ३-११, १२-१० अशी मात केली. या जेतेपदासह जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेली जोश्ना क्रमवारीत आगेकूच करण्याची शक्यता आहे. पहिला गेम गमावल्यामुळे जोश्नावरील दडपण वाढले होते, मात्र त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये ८-३ अशी भक्कम आघाडी घेत जोश्नाने चांगली सुरुवात केली. हीच आघाडी वाढवत जोश्नाने दुसरा गेम जिंकला. दमदार खेळ करत जोश्नाने तिसरा गेम जिंकला. हेबाने झुंजार खेळ करत चौथा गेम जिंकला. पाचव्या आणि निर्णायक गेममध्ये जोश्नाने ७-६ अशी आघाडी मिळवली. मात्र त्यानंतर हेबाने सलग सहा गुणांची कमाई करत मुकाबला १०-७ असा निर्णायक केला. मात्र दडपणाच्या क्षणी आपला खेळ उंचावत जोश्नाने उर्वरित गुण पटकावत शानदार विजय मिळवला. जोश्नाच्या विजयासह भारतीय खेळाडूंनी जेतेपद पटकावण्याची परंपरा कायम राहिली.