स्क्वॉशपटू जोश्ना चिनप्पाने कतार क्लासिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या इजिप्तच्या रनीम एल वेलिलीला नमवत कारकीर्दीतील संस्मरणीय विजयाची नोंद केली. राष्ट्रीय विजेता जोश्नाने अवघ्या ३७ मिनिटांत रनीमवर ११-९, ११-६, ४-११, ११-९ अशी मात केली. दीपिका पल्लीकलला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. इजिप्तच्या याथरेब अडेने दीपिकावर ११-५, ११-७, ११-७ असा विजय मिळवला. ‘हा माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम विजय आहे. जगातल्या अव्वल खेळाडूविरुद्ध विजय मिळवण्यासारखा आनंद नाही. रनीमविरुद्ध याआधी अनेकदा मी खेळले आहे, पराभूतही झाले आहे. ती कोणत्याही स्थितीतून पुनरागमन करू शकते. दडपण घेऊन खेळण्यापेक्षा आनंद घेत खेळले. त्यामुळेच विजय मिळाला’, असे जोश्नाने सांगितले.