scorecardresearch

स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद!; ऑल इंग्लंड बॅडिमटन स्पर्धेतील उपविजेत्या लक्ष्यची भावना

जागतिक स्तरावर देशासाठी नावलौकिक मिळवण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद असल्याची भावना ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणारा युवा भारतीय खेळाडू लक्ष्य सेननी व्यक्त केली.

पीटीआय : जागतिक स्तरावर देशासाठी नावलौकिक मिळवण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद असल्याची भावना ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणारा युवा भारतीय खेळाडू लक्ष्य सेननी व्यक्त केली. उत्तराखंडच्या २० वर्षीय लक्ष्यला ऑल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनकडून पराभूत व्हावे लागले. मात्र, अंतिम फेरीचा टप्पा गाठल्याबाबत तो समाधानी आहे. ‘‘अलमोडा ते ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेपर्यंतचा प्रवास मोठा आहे. मी अंतिम फेरीत पराभूत झालो; पण मी सर्वोत्तम खेळ करू शकलो याचे समाधान आहे. देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. मी माझे स्वप्न जगत आहे आणि यापुढेही दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न करेन,’’ असे लक्ष्यने ‘ट्विटर’वर लिहिले.

‘‘जगभरातून मला जे प्रेम मिळत आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. मी सर्वाचे आभार मानू इच्छितो. यासोबतच मी भारतीय बॅडिमटन संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे आभार मानतो. माझे वडील आणि भाऊ चिराग यांचे माझ्या यशातील योगदान मी विसरू शकत नाही. मी प्रकाश पदुकोण सर आणि विमल कुमार सर यांचेदेखील आभार मानतो. त्यांनी माझ्या मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे,’’ असेही लक्ष्य म्हणाला.

लक्ष्यची योग्य दिशेने वाटचाल -विमल

ऑल इंग्लंड बॅडिमटन स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर लक्ष्यवर सर्वाच्या नजरा असतील आणि आता त्याला आपल्या खेळातील विविधतेवर काम करावे लागेल, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक आणि लक्ष्यचे मार्गदर्शक विमल कुमार यांनी व्यक्त केले. प्रकाश पदुकोण अकादमीचा विद्यार्थी असलेल्या लक्ष्यने गेल्या सहा महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. ‘‘मी लक्ष्यच्या तंत्राने आनंदी आहे. लक्ष्यच्या खेळामध्ये खूप सुधारणा झाली आहे. तो कठीण परिस्थितीतही चांगला खेळ करत आहे. तो आता बचावही उत्तम करत असून अ‍ॅक्सेलसेन आणि आंद्रेस अँटोनसेनला त्याने चांगली झुंज दिली. आगामी काळात त्याच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल. त्याची वाटचाल योग्य दिशेने असून त्याला आपल्या विविधतेवर काम करावे लागेल,’’ असे विमल कुमार म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Joy making dream come true runner up goal all england badminton championships ysh

ताज्या बातम्या