Jude Bellingham fight with Argentina player in FIFA World Cup: लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने बुधवारी इंग्लंडचा पराभव करत लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. पाच दशकांहून अधिक काळ अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात मैदानातील शत्रुत्व प्रसिद्ध आहे. १९६६ पासून अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड असा सुरू झालेला वाद २०२६ मध्येही पाहायला मिळाला. साखळी आणि बाद फेरीच्या सामन्याप्रमाणे अर्जेंटिनाच्या संघाने याही सामन्यात ८० व्या मिनिटानंतर आघाडी घेतल्याचे दिसले. ८५ आणि ९२ व्या मिनिटाला दोन गोल करत अर्जेंटिनाने इंग्लंडवर २-१ ने विजय मिळवला. अर्जेंटिनाच्या दोन्ही गोलसाठी मेस्सीने असिस्ट केले होते, हे विशेष.

दरम्यान बुधवारी झालेल्या सामन्यात अनेकवेळा दोन्ही संघाचे खेळाडू आपापसात भिडल्याचे प्रकार घडले. सामन्यात एकूण चार येलो कार्ड्स दाखवली गेली. पराभवानंतर इंग्लंडचा स्टार खेळाडू ज्युड बेलिंगहॅमचे स्वतःवरील नियंत्रण सुटले आणि त्याने अर्जेंटिनाच्या एका खेळाडूच्या डोक्यात टपली मारली. यानंतर पुन्हा दोन्ही संघ आमनेसामने आलेले मैदानावर पाहायला मिळाले.

अटलांटाच्या मर्सिडीज-बेंझ स्टेडियमवर सामना सुरू झाल्यानंतर सहाव्या मिनिटालाच ज्युड बेलिंगहॅम आणि मेस्सी एकमेकांना भिडले होते. पंचाने दिलेल्या एका फॉलवरून दोघांची बाचाबाची झाली. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

‘इंग्लंडला आघाडी टिकवता आली नाही

सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी गोल करण्याचे भरपूर प्रयत्न केले. मात्र अर्जेंटिनाचा संघ वरचढ ठरला. इंग्लंडकडून ५५ व्या मिनिटाला अँथोनी गोर्डोनने शानदार गोल केला. मात्र त्यानंतर त्यांना अर्जेंटिनावर दबाव टाकण्यात यश आले नाही. उलट ८० व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा लौतारो मार्टिनेझ मैदानात आल्यानंतर खेळाचा नूरच पालटला.

बेलिंगहॅमची टपली

सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाचे खेळाडू ऐतिहासिक विजयाचा आनंद व्यक्त करत असताना बेलिंगहॅमने संयम गमावला आणि अर्जेंटिनाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी बेंचवरून मैदानात आलेल्या अर्जेंटिनाच्या व्हॅलेंटिन बार्कोच्या डोक्यात बेलिंगहॅमने टपली लगावली.

या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर अर्जेंटिनाचे खेळाडूही आक्रमक झालेले पाहायला मिळाले. काही जण बेलिंगहॅमवर धावून गेले. तर इतर काही खेळाडूंनी आक्रमक झालेल्या खेळाडूंना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

इंग्लंडच्या हॅरी केन आणि ज्युड बेलिंगहॅम या स्टार खेळाडूंकडून इंग्लंडला बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र दोघांनाही या सामन्यात चमक दाखवता आली नाही. दोघांनी प्रत्येकी सहा गोल करत संघाच्या १३ पैकी १२ गोलमध्ये मोलाचा वाटा उचलला होता. मात्र अर्जेंटिनाच्या विरोधातील सामन्यात दोघांनाही गोल करण्यात अपयश आल्यामुळे इंग्लंडचे दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात जाण्याचे स्वप्न भंगले.