भुवनेश्वर : गतविजेत्या भारताला कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदकानेही हुलकावणी दिली. रविवारी झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात भारताला फ्रान्सकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला.

सलामीच्या लढतीत फ्रान्सने भारतावर ५-४ अशी सरशी साधली होती. या पराभवाची परतफेड करत कांस्यपदक जिंकण्याचे ध्येय बाळगून भारतीय संघ रविवारी मैदानात उतरला. मात्र, कर्णधार टिमोथी क्लेमेंटने भारताविरुद्ध सलग दुसरी हॅट्ट्रिक करत फ्रान्सला विजय मिळवून दिला.

या सामन्याच्या १२व्या मिनिटाला अरायजीत सिंग हुंदलने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. त्यानंतर फ्रान्सला सलग तीन पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रात २६व्या मिनिटाला फ्रान्सला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळी कर्णधार क्लेमेंटने कोणतीही चूक न करता फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धाच्या सुरुवातीला भारताचा गोलरक्षक पवनने अप्रतिम खेळ केला. मात्र, ३४व्या मिनिटाला पुन्हा क्लेमेंटने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत फ्रान्सची आघाडी दुप्पट केली. यानंतर ४२व्या मिनिटाला सुदीपने केलेल्या गोलमुळे फ्रान्सची आघाडी १-२ अशी कमी झाली. चौथ्या सत्रात मात्र फ्रान्सला पुन्हो पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी एकावर क्लेमेंटने वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण करताना फ्रान्सच्या ३-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.