जर्मनीने वाटचाल रोखली; कांस्यपदकासाठी रविवारी फ्रान्सशी सामना

भुवनेश्वर : भारताला हॉकीमधील कनिष्ठ गटाचे विश्वविजेतेपद टिकवण्यात अपयश आले. उपांत्य फेरीत सहा वेळा विश्वविजेत्या जर्मनीकडून भारताने २-४ अशा फरकाने पराभव पत्करला. त्यामुळे रविवारी कांस्यपदकासाठी भारताची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे, तर विजेतेपदासाठी जर्मनी आणि अर्जेटिना यांच्यात सामना होईल.

लखनऊ येथे २०१६ मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारताचा जर्मनीपुढे निभाव लागला नाही. जर्मनीकडून ईरिक क्लिनलिन (१५व्या मि.), आरोन फ्लॅटन (२१व्या मि.), कर्णधार हॅनीस म्युलर (२४व्या मि.) आणि ख्रिस्टोफर कुटर (२५व्या मि.) यांनी गोल साकारले. भारताकडून उत्तम सिंग (२५व्या मि.) आणि बॉबी सिंग धामी (६०व्या मि.) यांनी गोल केले.

उपांत्यपूर्व फेरीमध्ये बेल्जियमविरुद्ध दिलेली लढत वाखाणण्याजोगी होती, परंतु तो कित्ता भारताला जर्मनीविरुद्ध गिरवता आला नाही.  जर्मनीने मध्यांतरालाच ४-१ अशी आघाडी घेऊन भारतावर दडपण आणले. तिसऱ्या सत्रात भारताने गोल करण्यासाठी काही उत्तम प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. सामना संपायला काही सेकंदांचा अवधी असतना धामीने भारताच्या खात्यावर दुसरा गोल जमा केला.