भुवनेश्वर : उपकर्णधार संजयने साकारलेल्या सलग दुसऱ्या हॅट्ट्रिकला अरायजीत सिंग हंडलच्या तीन गोलची उत्तम साथ लाभली. त्यामुळे गुरुवारी भारताने कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत ‘ब’ गटातील लढतीत कॅनडाला १३-१ असे नेस्तानाबूत केले.

गतविजेत्या भारताला बुधवारी फ्रान्सने ५-४ असा पराभवचा धक्का दिला. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला कॅनडाविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय अनिवार्य होता. फ्रान्सने अन्य लढतीत पोलंडचा ७-१ असा धुव्वा उडवून सलग दोन विजयांसह पुढील फेरी गाठली आहे. आता शनिवारी पोलंडविरुद्ध होणाऱ्या लढतीत भारताने विजय मिळवणे गरजेचे आहे.

भारताकडून या लढतीत संजयने अनुक्रमे १७, ३२ आणि ५९व्या मिनिटाला गोल केले. तर हंडलने ४०, ५० आणि ५१व्या मिनिटाला तीन गोल झळकावले. या दोघांव्यतिरिक्त उत्तम सिंग (३, ४७ मि.), शारदानंद तिवारी (३५, ५३ मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल साकारले, तर कर्णधार विवेक सागर प्रसाद (८ मि.) मणिंदर सिंग (२७ मि.) आणि अभिषेक लाक्रा (५५ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून योगदान दिले. कॅनडासाठी ख्रिस टार्डिफने ३०व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला.