भुवनेश्वर : संजय कुमार, अरायजीत सिंग हुंदल आणि सुदीप चिरमाको यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारताने कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत शनिवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात पोलंडचा ८-२ असा धुव्वा उडवला.

गतविजेत्या भारताला सलामीच्या लढतीत फ्रान्सने ४-५ असा पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, ‘ब’ गटातील पुढील दोन सामन्यांत कॅनडा (१३-१) आणि पोलंडचा (८-२) मोठय़ा फरकाने पराभव केल्याने भारताला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. पहिल्या दोन्ही सामन्यांत हॅट्ट्रिक  नोंदवणाऱ्या उपकर्णधार संजयने चमकदार कामगिरी सुरू ठेवली. त्याने (चौथे व ५८वे मिनिट) पोलंडविरुद्ध दोन केले. त्याच्यासह हुंदल (८वे, ८०वे मि.) आणि चिरमाको (२४वे, ४०वे मि.) यांनीही भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताचे उर्वरित दोन गोल उत्तम सिंह (३४वे मि.) आणि शरदानंद तिवारी (३८वे मि.) यांनी केले.

बुधवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा गतउपविजेत्या बेल्जियमशी सामना होईल. गट ‘अ’मध्ये बेल्जियम आणि मलेशिया यांचे समान सात गुण होते. मात्र, सरस गोल फरकामुळे बेल्जियमने अव्वल स्थान मिळवले. ‘ब’ गटात फ्रान्सने अव्वल स्थान मिळवले, तर भारताला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. शनिवारी झालेल्या अन्य लढतींत, फ्रान्सने कॅनडाला ११-१ अशी धूळ चारली. पाकिस्तानने इजिप्तवर ३-१ अशी, मलेशियाने दक्षिण आफ्रिकेवर ४-३ अशी, तर बेल्जियमने चिलीवर ३-० अशी मात केली.