भुवनेश्वर : धारदार आक्रमण आणि ‘ड्रॅग-फ्लिकिंग’मधील चमकदार कामगिरीच्या जोरावर सलग दोन सामने जिंकणाऱ्या गतविजेत्या भारतापुढे बुधवारी कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचे आव्हान असेल.

भारताला यंदाच्या स्पर्धेची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. फ्रान्सकडून सलामीला ४-५ असा पराभव पत्करल्यानंतर मात्र भारतीय संघाने खेळात कमालीची सुधारणा केली. ‘ब’ गटात त्यांनी कॅनडा (१३-१) आणि पोलंडचा (८-२) धुव्वा उडवत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, आता एकूण तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा कनिष्ठ विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारताची कसोटी लागणार आहे. २०१६ मध्ये कनिष्ठ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बेल्जियमला २-१ असे पराभूत केले होते. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी बेल्जियमचा संघ उत्सुक आहे. भारतीय संघाकडून उपकर्णधार संजय कुमारने सलग दोन हॅट्ट्रिक केल्या असून त्याच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.