मुंबई : महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कनिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेतील १८ वर्षांखालील गटाचे जेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत महाराष्ट्राला तमिळनाडूने पराभूत केले.दादरच्या स्काऊट हॉल येथे झालेल्या या स्पर्धेतील मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने विदर्भावर ३-० अशी मात करत जेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या मिहीर शेखने विदर्भाच्या सूरज गायकवाडवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १७-५, ६-२१, १७-११ असा विजय मिळवला. कौस्तुभ जागुष्टेने एआय यासिनवर २१-५, १-१८, १६-१४ अशी मात केली. दुहेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या अथर्व पाटील व एसआर रफिक जोडीने विदर्भाच्या जी. समुद्रे व एस. रेहान जोडीला १८-२, २५-० असे सहज नमवले. मुलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तमिळनाडूने उत्तर प्रदेश संघावर ३-० अशी मात केली.
मुलींच्या सांघिक गटात बलाढय़ तमिळनाडूकडून महाराष्ट्राने ०-३ अशी हार पत्करली. तमिळनाडूच्या एच. आविष्काराने महाराष्ट्राच्या दीक्षा चव्हाणवर १८-३, २१-१ असा विजय नोंदविला. एम. खझिमाने महाराष्ट्राच्या केशर निर्गुणवर १३-११, २१-० अशी मात केली. दुहेरीच्या लढतीत तमिळनाडूच्या व्ही. मित्रा आणि सुपर्णा जोडीने महाराष्ट्राच्या श्रुती वेळेकर आणि ज्ञानेश्वरी इंगुळकरवर २४-०, १२-१४, २१-७ असा विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.