NZ vs WI Test Justin Greaves world record: न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील क्राइस्टचर्च येथे खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी कडवी झुंज देत न्यूझीलंडच्या संघाला मोठी धावसंख्या उभारूनही विजय मिळवू दिला नाही. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर ५३१ धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल, वेस्ट इंडिज संघाने शानदार कामगिरी करत ४५७ धावा केल्या आणि सामना अनिर्णित ठेवला. यादरम्यान द्विशतकी खेळी करणाऱ्या जस्टिन ग्रीव्हसने विश्वविक्रम केला आहे.
वेस्ट इंडिजच्या शानदार फलंदाजी करणाऱ्या जस्टिन ग्रीव्हजने इतिहास रचला आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. ग्रीव्हजने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं आणि एक अनोखा विक्रमही आपल्या नावे केला.
५३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिज संघाने ७२ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या आणि संघ कठिण परिस्थितीत होता. यानंतर शे होपने उत्कृष्ट शतकी खेळी केली. होपने २३४ चेंडूंत १५ चौकार व २ षटकारांसह १४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेल्या जस्टिन ग्रीव्हसने मात्र नाबाद द्विशतक करत संघाचा पराभव टाळला.
जस्टिन ग्रीव्हसने ३८८ चेंडूत १९ चौकारांसह नाबाद २०२ धावांची खेळी केली. या कामगिरीसह, ग्रीव्हस चौथ्या डावात सहाव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना द्विशतक करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. याआधी चौथ्या डावात सहा किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाेत्कृष्ट खेळी बेन स्टोक्सने केली होती. स्टोक्सने ऑस्ट्रेलियाविरूद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर १५५ धावांची खेळी केली होती.
याशिवाय जस्टिन ग्रीव्हस हा सहाव्या क्रमांकावर द्विशतक करणारा वेस्ट इंडिजचा देखील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने कार्ल हूपरचा विक्रम मोडला. १९९३ मध्ये कार्ल हूपरने पाकिस्तानविरुद्ध सहाव्या क्रमांकावर नाबाद १७८ धावा केल्या.
चौथ्या डावात सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना द्विशतक
२०२* धावा – जस्टिन ग्रीव्हस विरुद्ध न्यूझीलंड (क्राईस्टचर्च)
१५५ धावा – बेन स्टोक्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया (लॉर्ड्स)
१४९ – अॅडम गिलख्रिस्ट विरुद्ध पाकिस्तान (होबार्ट)
जस्टिन ग्रीव्हस चौथ्या डावात द्विशतक करणारा सातवा खेळाडू ठरला. यापूर्वी जॉर्ज हेडली विरुद्ध इंग्लंड (१९३०), बिल एड्रिच विरुद्ध दक्षिण आफ्रिका (१९३९), सुनील गावस्कर विरुद्ध इंग्लंड (१९७९), गॉर्डन ग्रीनिज विरुद्ध इंग्लंड (१९८४), नॅथन अॅस्टल विरुद्ध इंग्लंड (२००२), काइल मेयर्स विरुद्ध बांगलादेश (२०२१) यांनी ही कामगिरी केली होती.
