पीटीआय, न्यूयॉर्क : विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने आपले वर्चस्व अधोरेखित करताना ज्युलियस बेअर जनरेशन चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीवर मात केली. या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन लढतींपैकी पहिली लढत जगज्जेत्या कार्लसनने २.५-०.५ अशा फरकाने जिंकली. त्यामुळे जेतेपदाच्या आशा कायम राखण्यासाठी अर्जुनने चार डावांची दुसरी लढत जिंकणे अनिवार्य आहे. अर्जुनने दुसऱ्या लढतीत विजय मिळवल्यास अंतिम विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब केला जाईल. मात्र, कार्लसनने दुसऱ्या लढतीतही बाजी मारल्यास तो या स्पर्धेचे विजेतेपद मिळवेल.

अंतिम फेरीतील पहिल्या लढतीच्या पहिल्या डावापासूनच कार्लसनने अप्रतिम खेळ केला. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना कार्लसनने पहिला डाव ४० चालींमध्ये जिंकला. दुसऱ्या डावात त्याने अर्जुनवर अधिक दडपण टाकले आणि २९ चालींअंती विजय नोंदवला. १९ वर्षीय अर्जुनने तिसऱ्या डावात खेळात सुधारणा करत कार्लसनला बरोबरीत रोखले. मात्र, त्याला विजय मिळवण्यात अपयश आल्याने कार्लसनने अंतिम फेरीतील पहिली लढत २.५-०.५ अशी जिंकली.