प्रो-कबड्डीने आज सर्व भारतावर गारुड केलं आहे. एरवी आयपीएल आणि फुटबॉलच्या सामन्यांसाठी वेडा असणारा तरुणवर्ग आज कबड्डीकडे वळला आहे. महाराष्ट्राच्या रांगड्या मातीत खेळल्या जाणाऱ्या या खेळाला प्रो-कबड्डीने एक वेगळी ओळख करुन दिली. राज्यातल्या अनेक खेळाडूंना यामुळे राष्ट्रीय पातळीवर एक नवीन ओळख मिळाली, तसचं आर्थिक पाठबळामुळे अनेक खेळाडूंच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होतानाही आपण पाहिला.
मात्र प्रो-कबड्डीच्या आधी कबड्डीचा हा वटवृक्ष महाराष्ट्रात एका अवलियाने रुजवला. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचा आज जन्मदिवस. संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांचा जन्मदिवस ‘कबड्डी दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज कबड्डीने देशवासियांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे, इतकचं नव्हे तर मातीतला हा खेळ खऱ्या अर्थाने ग्लोबल झालाय. इराण, जपान, थायलंड, केनिया सारख्या अनेक देशांमध्ये आज कबड्डी खेळली जात आहे. कबड्डीला सोनेरी दिवस दाखवण्यात बुवा साळवींचा अमुलाग्र वाटा आहे.
बुवा साळवी हे महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या कबड्डी संघटनेचे आधारस्तंभ होते असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचं तहहयात अध्यक्षपद बुवांकडे होतं. कबड्डीला आंतराष्ट्रीय स्तरावर नेण्याआधी देशातल्या सर्व राज्यांच्या संघटनांची एकत्र मोट बांधण हे सर्वात महत्वाचं काम बुवांसमोर होतं.
पारंपरिक ‘हुतुतू’ खेळाचे पुरस्कर्ते हे पुर्वी कबड्डीशी एकरुप होण्यास तयार नव्हते. दक्षिणेतील राज्यांना उत्तरेत वापरल्या जाणाऱ्या कबड्डी या शब्दावर तर विशेष आक्षेप होता. हा खेळ ९ खेळाडूंचाच असावा आणि त्याला ‘हुतुतू’हेच नाव द्यावं असा दक्षिणेतील राज्यांचा आग्रह होता. मात्र यावेळी बुवा साळवींनी महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन नाराज खेळाडूंची समजूत काढली आणि कबड्डीसाठी सगळ्यांची सहमती मिळवली.
बुवा साळवींनी केलेल्या प्रयत्नांमुळेत कबड्डीचा १९९० च्या आशियाई खेळांमध्ये समावेश झाला. आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा कबड्डी हा भारतासाठी हक्काचा क्रीडाप्रकार बनला होता. यानंतर अनेक देश कबड्डी खेळायला लागले. विशेषकरुन जपान सारख्या देशात कबड्डीची बीजं बुवांनी रुजवली. भारतात गावोगावी खेळला जाणारा खेळ आंतराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी खास सराव सामने आयोजित करणं, शिवाजी पार्कवर ‘डिस्कवरी चॅनल’च्या टीमसोबत कबड्डीखेळाचा माहितीपट तयार करणं यासारखे अनेक प्रयत्न बुवांनी आपल्या कारकिर्दीत केले.
कबड्डीसाठी बुवांनी आपलं आयुष्य वेचलं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, यांच्यासह अनेक मान्यवर देशांच्या राजदुतांना बुवांनी कबड्डीच्या प्रचाराकरता मैदानात आणलं होतं. काहीकाळानंतर देशाच्या कबड्डीची सुत्र आपल्या हातात आल्यानंतर खरतरं आपला फायदा बघणं हे बुवा साळवींना सहज जमलं असतं, मात्र खेळाशी इमान राखलेल्या बुवा साळवींना हे कधीच जमलं नाही. बुवांबद्दल एक किस्सा आवर्जुन सांगितला जातो. बुवा हे आयुष्यभर भाड्याच्या खोलीत रहायचे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बुवांना तुम्हाला काय हवं ते मागा असं सांगितलं. यावेळी बुवांनी आपल्यासाठी काहीही न मागता कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयासाठी जागा मागितली.
कबड्डीतल्या आपल्या कार्यासाठी बुवांना अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र आणि देशभरात बुवा ‘कबड्डी महर्षी’ नावाने ओळखले जायचे. सरकारनेही त्यांचा मानाचा ‘शिवछत्रपती जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सत्कार केला होता. वयाच्या ७५ व्या वर्षी बुवांचं दीर्घ आजारानं निधन झालं. आजच्या कबड्डी दिनाचं औचित्य साधून मुंबईत अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दादरच्या शारदाश्रम विद्यालयात बुवांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून विशेष कबड्डी प्रशिक्षण शिबीराचं आयोजनं केलं होतं. यावेळी अनेक माजी खेळाडूंनी बुवांबद्दलच्या आठवणी जागवल्या.
”बुवा हे कबड्डीचे उत्तम संघटक होते. चांगल्या खेळाडूंना हेरुन त्यांना संघात स्थान देणं हे त्यांनी नेहमी केलं. माझ्या सुरुवातीच्या काळात मी बुवांना व्यक्तीश: ओळखत नव्हतो. पण एका सामन्यादरम्यान त्यांनी स्वतः येऊन माझ्या खेळाची चौकशी केली. त्यानंतर माझी आणि बुवांची ओळख झाली. खेळाडूंना मैदान मिळवून देण्यापासून ते प्रत्येक बाबतीत बुवा भक्कम खांबासारखे खेळाडूंच्या पाठीशी उभे रहायचे. हुतूतू-कबड्डीचा वाद मिटवून कबड्डीला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यात बुवांचा मोठा वाटा होता. आज जर प्रो-कबड्डीचे सामने बघायला बुवा आपल्यात असते तर आपण झटत असलेल्या खेळाचं हे बदललेलं रुपडं पाहुन त्यांना नक्कीच समाधान वाटलं असतं.”
– राजु भावसार (चेअरमन, अॅथलिट्स कमिशन )
”बुवा आणि आमचे घरचे संबंध होते. मी लहान असल्यापासून बुवांचं कबड्डीमधलं काम पाहतं आलं आहे. महाराष्ट्राचे अनेक खेळाडू बुवांनी आपल्या हाताखाली घडवले. खरतर बुवांमुळेच महाराष्ट्राच्या कबड्डीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. महाराष्ट्राच्या मुलींच्या सिनीअर संघाची निवड जळगाव येथे होणार होती. यासाठी ज्युनिअर संघातून मी एकमेव खेळाडू होते. यावेळी माझा खेळ पाहून बुवांनी स्वतः माईक हातात घेत, द ग्रेट मेघाली कोरगावकर असं माझं नाव जाहीर केलं होतं. ज्युनिअर संघातून येऊनही मी केलेला खेळ त्यांना विशेष आवडला होता. म्हणूनच त्यांनी संघात माझी १२ वी खेळाडू म्हणून निवड केली होती. माझ्या आयुष्यात मी हा प्रसंग कधीही विसरु शकणार नाही.”
– मेघाली कोरगावकर (शिवछत्रपती पुरस्कार विजेती कबड्डीपटू)