Kagiso Rabada Ball To Dismiss Suryakumar Yadav: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३० वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. रबाडाने पावरप्लेमध्येच मुंबई इंडियन्सला ३ मोठे धक्के दिले. यादरम्यान रबाडाने सूर्यकुमार यादवला बाद करण्यासाठी ताशी १५२ किमीच्या गतीने चेंडू टाकून बाद केलं. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, सूर्यकुमार यादव या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. सुरुवातीचे २ फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादववर डाव सांभाळण्याची जबाबदारी होती. पण तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला. यादरम्यान त्याने १० चेंडूंमध्ये १५ धावांची खेळी केली. गुजरात टायटन्सकडून पावरप्लेमधील शेवटचे षटक टाकण्यासाठी रबाडा गोलंदाजीला आला. षटकातील पाचवा चेंडू रबाडाने ताशी १५२ किमीच्या गतीने गुड लेंथवर टाकला. जो टप्पा पडताच वेगाने आत आला. सूर्यकुमार यादवने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण बॅट आणि पॅडमध्ये बरंच अंतर असल्याने चेंडू जाऊन यष्टीला धडकला.

मुंबईला पावरप्लेमध्ये ३ मोठे धक्के

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. पण मुंबईला हवी तशी सुरूवात करता आली नाही. आपलाच पहिलाच सामना खेळत असलेला विदर्भाचा दानिश मालेवार अवघ्या २ धावा करून माघारी परतला. त्यानंतर क्विंटन डीकॉकने १३ धावा करून पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर सूर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी होती. पण सूर्यकुमार यादव अवघ्या १५ धावांवर माघारी परतला. या तिन्ही फलंदाजांना कगिसो रबाडाने बाद करत माघारी धाडलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला हवी तशी सुरूवात मिळू शकली नाही.

या सामन्यासाठी अशी आहे मुंबईची प्लेईंग ११:

दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह, ए. एम. गझनफर