scorecardresearch

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रतेचे लक्ष्य! मुंबई पूर्ण मॅरेथॉन पदार्पणात तिसऱ्या क्रमांकाबाबत कालिदास हिरवे समाधानी

‘‘मला २ तास १४ मिनिटांचा वेळ गाठणे शक्य होते. मात्र, साधारण २९ किलोमीटर पूर्ण केल्यानंतर माझ्या पायाचे स्नायू आखडले.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रतेचे लक्ष्य! मुंबई पूर्ण मॅरेथॉन पदार्पणात तिसऱ्या क्रमांकाबाबत कालिदास हिरवे समाधानी
कालिदास हिरवे फोटो- लोकसत्ता

अन्वय सावंत, लोकसत्ता

मुंबई : मुंबई पूर्ण मॅरेथॉनमध्ये मी प्रथमच धावलो. यापूर्वी मी २०१९मध्ये अर्ध-मॅरेथॉन शर्यतीत तिसरा क्रमांक मिळवला होता. त्या कामगिरीची पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुनरावृत्ती करण्यात यश आल्याचे समाधान आहे. २ तास ११ मिनिटे ही माझी सर्वोत्तम कामगिरी आहे आणि मुंबई मॅरेथॉन मी २ तास १९ मिनिटांत पूर्ण केली. आता या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे माझे लक्ष्य आहे. त्यासाठी येत्या दोन-तीन महिन्यांत मी २ तास १४ मिनिटांचा वेळ गाठण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया कालिदास हिरवेने व्यक्त केली.

मूळचा सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीचा, पण पुण्यात बालेवाडी येथे राजगुरू कोचळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या कालिदासने मुंबई मॅरेथॉनच्या ‘एलिट’ गटात भारतीय पुरुषांमध्ये तिसरे स्थान पटकावले. ३० किमी अंतरापर्यंत मॅरेथॉन विजेता गोपी थोनाक्कल आणि उपविजेता मान सिंह यांच्यात व कालिदासमध्ये केवळ ६ सेकंदांचे अंतर होते. मात्र, त्याच वेळी पायाचे स्नायू आखडल्यामुळे (क्रॅम्प) गती कायम राखण्यात कालिदासला अपयश आले. पण जिद्दीच्या जोरावर त्याने ही शर्यत पूर्ण केली.

‘‘मला २ तास १४ मिनिटांचा वेळ गाठणे शक्य होते. मात्र, साधारण २९ किलोमीटर पूर्ण केल्यानंतर माझ्या पायाचे स्नायू आखडले. त्यामुळे मला धावणे खूप अवघड झाले होते. मात्र, मी संयम बाळगला. आपण हार मानायची नाही, अखेपर्यंत लढायचे हे मनाशी ठरवले. विशेषत: ग्रामीण भागातील असल्याने मानसिकदृष्टय़ा मी खूप कणखर आहे. माझी दुखापत वाढू शकेल असा नकारात्मक विचार माझ्या मनातही आला नाही. मी माझी धावण्याची गती कमी केली. त्यामुळे पायावरील ताण काहीसा कमी झाला. मी जिद्दीच्या बळावर शर्यत पूर्ण केली. शर्यत संपल्यावर मी जमिनीवर कोसळलो आणि मला उठणेही शक्य होत नव्हते. मी पदक घेण्यासाठीही जाऊ शकलो नाही,’’ असा मुंबई पूर्ण मॅरेथॉन शर्यतीचा अनुभव कालिदासने सांगितला.

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी कालिदासने पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे जेतेपद पटकावले होते. तसेच त्याने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेतील १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. आता तो फेब्रुवारीत दिल्ली मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 03:58 IST

संबंधित बातम्या