Kamindu Mendis became 1st Sri Lankan player to four fastest centuries in Test : श्रीलंकेच्या संघाला नवा सुपरस्टार मिळाला आहे. या सुपरस्टारचे नाव कमिंदू मेंडिस असून, तो केवळ २५ वर्षांचा आहे. या युवा फलंदाजाने कामगिरी केली आहे, ज्याचा लोक स्वप्नातही विचार करणार नाहीत. कामिंदू मेंडिसने त्याच्या सातव्या कसोटी सामन्यात चौथे शतक झळकावले आहे. कमिंदूने न्यूझीलंडविरुद्ध गॉल कसोटीत शतक झळकावले. या डावखुऱ्या फलंदाजाने प्रथमच अव्वल पाचमध्ये फलंदाजी केली. त्याने संकटात सापडलेल्या आपल्या संघाचा डाव सांभाळत सर्वात जलद चार शतकं झळकावणारा श्रीलंकेचा पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला.

श्रीलंकेचा युवा फलंदाज कमिंदू मेंडिसने सात कसोटी सामन्याच्या ११ डावात चौथे शतक झळकावले आहे. त्याने ८९ च्या सरासरीने ८०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कमिंदू मेंडिसने नुकत्याच इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत पाच कसोटी सामन्यात सर्वात जलद ६०० हून अधिक धावा करणारा जगातील सातवा फलंदाज ठरला होता. कामिंदू मेंडिसची खास गोष्ट म्हणजे तो आतापर्यंत एकाही सामन्यात अपयशी ठरला नाही. त्याने कसोटी पदार्पण केल्यापासून प्रत्येक सामन्यात शतक किंवा अर्धशतक झळकावले आहे. मेंडिसने २०२२ मध्ये गॅले येथे कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात त्याने ६१ धावा केल्या होत्या.

कमिंदू मेंडिसची आतापर्यंतची कसोटीतील कामगिरी –

  • ६१- गॉल
  • १०२ आणि १६४- सिल्हेट
  • ९२* आणि ९- चट्टोग्राम
  • १२ आणि ११३- मँचेस्टर
  • ७४ आणि ४- लॉर्ड्स
  • ६४- द ओव्हल
  • ११४- गॉल

हेही वाचा – कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कामिंदूच्या शतकामुळे श्रीलंकेने पहिल्या दिवशीच ७ बाद ३०२ धावा केल्या आहेत. या सामन्यात श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि २० धावांवर पहिली विकेट पडली. दिमुथला केवळ दोन धावा करता आल्या. पाथुम निसांका २७, दिनेश चडिमल ३०, अँजेलो मॅथ्यूज ३६ धावा करून बाद झाले. कुशल मेंडिस आणि कामिंदू मेंडिस यांच्यात सहाव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी झाली. कुशल ५० धावा करून बाद झाला. यानंतर कामिंदू मेंडिसने १७३ चेंडूचा सामना करताना ११ चौकारांच्या मदतीने ११४ धावांचे योगदान देत संघाचा डाव सावरला.

कामिंदू मेंडिसची कारकीर्द –

कामिंदू मेंडिसची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २०१८ मध्ये सुरू झाली. दोन्ही हातांनी गोलंदाजी केल्याने हा खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात आला. मेंडिस डाव्या हाताच्या फलंदाजांना उजव्या हाताने ऑफस्पिन आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना डाव्या हाताने लेगस्पिन गोलंदाजी करतो. अप्रतिम प्रतिभा असूनही मेंडिसला श्रीलंकेच्या संघात फारशा संधी मिळाल्या नाहीत. २०२२ मध्ये कसोटी पदार्पणात शानदार अर्धशतक झळकावल्यानंतर त्याला दोन वर्षांसाठी कसोटी संघाबाहेर ठेवण्यात आले होते, पण आता संधी मिळताच या खेळाडूने मागे वळून पाहिले नाही. आता मॅडिसची कसोटी सरासरी ब्रॅडमननंतर सर्वाधिक आहे.