भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटला, की क्रिकेटप्रेमींसाठी ती मेजवानी असते. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकत्र येतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळवली गेली पाहिजे, असे मत अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी दिले आहे. आता पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज कामरान अकमल यानेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

कामरान अकमलच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली या मालिकेसाठी मुख्य भूमिका बजावू शकतो. तो म्हणाला, ”गांगुलीने पाकिस्तानविरुद्ध खूप क्रिकेट खेळले आहे. दोन्ही देशातील क्रिकेटच्या महत्वाविषयी तो जाणतो. गांगुलीलाही ही मालिका व्हावी अशी इच्छा आहे. मी त्याच्यासोबत खेळलो आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध चांगले होऊ शकतात.”

”सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंना देखील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जावी, असे वाटत असेल. परंतु याबाबत कुठलाही खेळाडू मोकळेपणाने बोलू शकत नाही. कारण त्यांच्या बोलण्याने वाद निर्माण होऊ शकतात. आयसीसीदेखील दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मुख्यतः वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवली गेली तर दोन्ही देशातील नातेसंबंधात सुधारणा होऊ शकते”, असेही कामरानने सांगितले.

हेही वाचा – लग्नाच्या ११व्या वाढदिवसानिमित्त धोनीनं आपल्या बायकोला दिलं ‘खास’ गिफ्ट!

भारतीय आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये २०१३ मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत वादांमुळे पाकिस्तान संघातील खेळाडूंना भारतात येण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.