वेलिंग्टनच्या मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आपली पकड मजबूत बसवली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला १६५ धावांत गुंडाळल्यानंतर…न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आश्वासक फलंदाजी करताना संघाचा डाव सावरला. वेलिंग्टनचं बेसिन रिजर्व्ह मैदान हे खेळपट्टीवर गवत आणि मैदानावर सतत वाहणाऱ्या वाऱ्यांसाठी ओळखलं जातं.

अनेकदा गोलंदाज याच वाऱ्याचा फायदा घेत चेंडू स्विंग करताना दिसतात. मात्र न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसोबत या सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला. पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान टीम साऊदी सामन्यातलं ४६ वं षटक टाकत होता. यावेळी मैदानात वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की विल्यमसनच्या डोक्यावरची टोपी उडून जमिनीवर पडली. नंतर हीच टोपी वाऱ्यामुळे एखाद्या चेंडूसारखी सीमारेषेबाहेर गेली. यावेळी आपली टोपी पकडण्यासाठी विल्यमसनची धावपळ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दरम्यान पहिल्या डावात भारताकडून अजिंक्य रहाणेने एकाकी झुंज दिली. अखेरच्या फळीत मोहम्मद शमीनेही फटकेबाजी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन देण्यात मदत केली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत आपली पकड मजबूत ठेवली आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल आता काय लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.