Kane Williamson Announces International Retirement: न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विल्यमसनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. केन विल्यसमनच्या निवृत्तीची माहिती न्यूझीलंड क्रिकेटचं सोशल मीडिया अकाऊंट ब्लॅककॅप्सवरून देण्यात आली आहे. केनने तात्काळ निवृत्ती जाहीर केल्याची पोस्ट संघाने शेअर केली आहे. याचबरोबर केन विल्यसमनचा एक मोठा व्हीडिओदेखील त्यांनी शेअर केला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असतानाच विल्यमसनने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे.
केन विल्यसमनच्या निवृत्तीच्या घोषणेसह त्याच्या तब्बल १६ वर्षांच्या गौरवशाली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम लागला आहे. २०१० मध्ये न्यूझीलंडकडून पदार्पण करणाऱ्या विल्यमसनने आपल्या देशासाठी ३७८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने फलंदाजीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींचा आदर व प्रशंसा मिळवली. ३५ वर्षीय विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १९,३४६ धावा करत न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून कारकीर्द संपवली. त्याच्या नावावर ४८ शतकं आणि ६ द्विशतकांची नोंद आहे.
फलंदाज म्हणून अफाट यश मिळवण्याबरोबरच त्याचे नेतृत्वही तितकंच प्रभावी ठरलं. २०१६ ते २०२४ या काळात त्याने तिन्ही प्रकारांत न्यूझीलंड संघाचं नेतृत्व केलं. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने दोन आयसीसी विश्वचषकांच्या अंतिम फेरी गाठल्या, तीन वेळा उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि २०२१ मध्ये पहिल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपदही पटकावले.
गेल्या नोव्हेंबरमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम देण्याची ही योग्य वेळ असल्याचं विल्यमसनने सांगितलं. त्याच्या निवृत्तीमुळे न्यूझीलंड क्रिकेटच्या एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.
निवृत्तीची घोषणा करताना केन विल्यमसन म्हणाला, “मी या निर्णयाचा बराच काळ विचार करत होतो. मात्र गेल्या काही दिवसांत मला स्पष्टपणे जाणवलं की आता निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल माझ्या मनात नेहमीच प्रचंड जिद्द आणि भूक होती. न्यूझीलंडसाठी खेळलेल्या प्रत्येक सामन्यात मी माझे सर्वस्व दिलं, याचा मला अभिमान आहे. त्यामुळे पूर्णपणे समर्पण न देता खेळणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे स्वतःच्या अटींवर हा निर्णय घेता येत आहे, हे माझं भाग्य समजतो.”
पुढे विल्यमसन म्हणाला, “या संघाचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल असल्याच्या भावनेने मी मैदान सोडत आहे. या संघात प्रचंड प्रतिभा आहे आणि न्यूझीलंडसाठी काहीतरी विशेष करून दाखवण्याची तीव्र इच्छा आहे. हा संघ माझ्यासाठी खूप खास आहे. इतक्या वर्षांपर्यंत या संघाचा भाग राहण्याचं भाग्य मला लाभलं, याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. न्यूझीलंडचा हा संघ माझ्या हृदयाच्या कायम जवळ राहील.”
