Kapil Dev Chandu Borde video: भारतीय क्रिकेटमधील दोन सुवर्णकाळांची एकाच खेळपट्टीवर भेट झाल्याचा व्हीडिओ सध्या पाहायला मिळत आहे. १९८३ चे विश्वविजेते कर्णधार कपिल देव आणि ९३ वर्षीय ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. वय हा फक्त एक आकडा असून क्रिकेट हे दिग्गजांच्या कसं रोमारोमात मुरलंय याचा प्रत्यय या व्हीडिओमधून येतोय. हा दुर्मिळ क्षण पाहून क्रिकेटप्रेमींच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
ऐतिहासिक पुना क्लब लिमिटेडच्या क्रिकेट मैदानाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हे दोन्ही दिग्गज उपस्थित होते. या क्लबने आपल्या क्रीडा प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, नव्याने विकसित केलेल्या जागतिक दर्जाच्या वाळू-आधारित क्रिकेट मैदानाचे भव्य उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला क्रिकेटचे दिग्गज कपिल देव आणि भारताचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या नव्या मैदानावर कपिल देव व चंदू बोर्डे खेळण्यासाठी उतरले. ६७ वर्षी कपिल देव यांनी ९३ वर्षीय चंदू बोर्डे यांना गोलंदाजी केली. चंदू बोर्डे अगदी पारंपरिकरणे बॅटने मार्किंग करत फलंदाजीसाठी सज्ज झाले. वयाची ९३ वर्षे ओलांडली असली तरी बॅटची पकड आणि क्रिकेटची ओढ आजही तशीच असल्याचं दिसलं. चंदू बोर्डे यांनी खुद्द ‘हरियाणा हुर्रिकन’ कपिल देव यांच्या गोलंदाजीवर सुंदर फटके खेळले. दुसऱ्या चेंडूवरचा कव्हर ड्राईव्ह तर कमाल होता. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या चाहत्यांनीही या सुवर्णक्षणाचा आनंद घेत दोन्ही दिग्गजांचं कौतुक केलं.
कोण आहेत चंदू बोर्डे?
चंदू बोर्डे पूर्ण नाव चंद्रकांत गुलाबराव बोर्डे हे भारतीय क्रिकेट इतिहासातील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहेत. १९५८ ते १९६९ या सुवर्णकाळात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं. मधल्या फळीतील एक भरवशाचा फलंदाज आणि तितकाच प्रभावी लेग-स्पिनर म्हणून त्यांची जगात ख्याती होती. त्यांनी भारतासाठी ५५ कसोटी सामने खेळले असून, त्यामध्ये ५ शतकांच्या मदतीने ३०६१ धावा केल्या आणि ५२ बळीही घेतले. विशेषतः १९६० च्या दशकात भारतीय क्रिकेटची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता; म्हणूनच आजही त्यांना भारतीय क्रिकेटचे ‘ग्रँड ओल्ड मॅन’ मानलं जातं.
चंदू बोर्डे यांची वेस्ट इंडिजविरूद्धचं कसोटी पदार्पण लक्षवेधी ठरलं. १९५८-५९ मध्ये त्यांनी जायंट वेस्ट इंडिजसमोर पदार्पणातच १०९ आणि ९६ धावांच्या खेळी केल्या, या खेळीच्या बळावर त्यांनी भारतीय संघातील आपलं स्थान अधिक बळकट केलं. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही बोर्डे यांनी विविध भूमिकांतून भारतीय क्रिकेटची सेवा सुरूच ठेवली. त्यांनी दोन वेळा भारतीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली. भारतीय संघाचे व्यवस्थापक (Manager) म्हणूनही त्यांनी अनेक महत्त्वाच्या दौऱ्यांवर जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘अर्जुन पुरस्कार’ देऊन गौरविले आहे.
