भारताच्या पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला होता. कपिल देव हे जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानले जातात. वयाची ६० ओलांडली असली तरी कपिल देव तितकेच फिट असल्याचं त्यांनी डान्स करताना व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये दिसतं.
भारतीय संघाचाे माजी कर्णधार नुकतेच एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कपिल देव यांच्या मित्राच्या घरातील आहे. कपिल देव काळा कुर्ता घालून डान्स करत आहेत. बॉलीवूडमधील प्रसिद्ध जुनं गाणं ‘सामने ये कौन आया’ यावर ते त्यांच्या मित्रपरिवाराबरोबर डान्स करताना दिसले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, गायक आणि संगीतकार विक्रम आदित्य कोहली देखील या पार्टीत लाईव्ह परफॉर्म करत होते.
स्वत: विक्रम आदित्य कोहली यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या दिल्लीतील मित्रांसाठी २ वर्षांपूर्वी नैनितालमध्ये गात असताना, ज्यांनी मला खूप प्रेम दिलं. कपिल पाजी आनंद घेताना.’
विक्रम आदित्य कोहली यांनी हा २ वर्षांपूर्वीचा व्हीडिओ शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे. अष्टपैलू खेळाडू कपिल देव हे हरियाणा हरिकेन नावाने प्रसिद्ध होते. कपिल देव यांनी १९७८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले.
कपिल देव यांनी १३१ कसोटी सामन्यांमध्ये ३१.०५ च्या सरासरीने ५२४८ धावा केल्या आहेत, ज्यात ८ शतकं आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये त्यांनी २९.६४ च्या सरासरीने ४३४ विकेट्सही घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, या दिग्गज खेळाडूने २२५ सामन्यांमध्ये २३.७९ च्या सरासरीने ३७८३ धावा केल्या, ज्यामध्ये एक शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
कपिल देव यांनी २७.४५ च्या सरासरीने २५३ विकेट्सही घेतल्या. कपिल देव यांनी सर्व फॉरमॅटसह १०८ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले, त्यापैकी ४३ सामने जिंकले तर ४० सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला.