कपिल देव यांनी शेअर केला ‘83’ चित्रपटाचा ट्रेलर; भावूक होत म्हणाले, ‘‘माझ्या संघाची कहाणी”!

या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

Kapil dev reaction on 83 movie trailer saying the story of my team
83 चित्रपट आणि कपिल देव

बहुप्रतिक्षित ’83’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर बॉलिवूड आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १९८३च्या विश्वचषकात भारताच्या विजयावर आधारित या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. इतिहास घडवण्यासाठी भारतीय संघाने वेगवेगळ्या अडचणींवर मात कशी केली, यावर हा चित्रपट केंद्रित आहे. भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना ‘माझ्या संघाची कहाणी’ असे अभिमानाने म्हटले आहे.

कबीर खान दिग्दर्शित ’83’ ची कथा भारताच्या ऐतिहासिक १९८३ क्रिकेट विश्वचषक विजयाभोवती फिरते. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी विश्वचषक जिंकत इतिहास रचला. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. तो पाहिल्यावर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

लॉर्ड्स मैदानात भारतीय संघाने रचलेला इतिहास पुन्हा नव्याने जगण्याची संधी या चित्रपटाद्वारे मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. ३ मिनिटे ४९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये १९८३ साली झालेल्या लंडनमधील लॉर्ड्स मैदानातील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना दाखवण्यात आला आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांनी केलेली तयारी दाखवण्यात आली आहे. तसेच भारतीय संघाला ज्या प्रकारे वागणूक देण्यात आली ते दाखवणारा हा ट्रेलर आहे.

हेही वाचा – IND vs NZ : अजिंक्य रहाणेची टीम इंडियातून हकालपट्टी?; राहुल द्रविड म्हणतो, ‘‘तो लवकरच…”

चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
’83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kapil dev reaction on 83 movie trailer saying the story of my team adn

ताज्या बातम्या