यंदाच्या आयपीएल हंगामात षटकारांनी लक्ष वेधून घेतलं आहे. फलंदाज सामन्यात कोणत्याही क्षणी मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडूला भिरकावून देत आहेत. भारतीय संघाचे माजी वर्ल्डकपविजेते कर्णधार कपिल देव निष्णात गोल्फपटू आहेत. आयपीएल हंगामाच्या निमित्ताने या दोन खेळातली साम्यस्थळं आणि गोल्फ खेळणं क्रिकेटपटूंना कसं फायदेशीर ठरतंय हे सांगितलं.
टायमिंग सगळ्यात महत्त्वाचं
टायमिंग हा क्रिकेट आणि गोल्फमधलं साधर्म्य आहे. तुमच्याकडे टायमिंग नसेल तर तुम्ही फक्त जोरात चेंडू माराल. तो षटकार जाणार नाही. तुमची ग्रिप व्यवस्थित असेल तर परिणाम सुरेख दिसून येतो आणि गोष्टी बदलतात. खेळाडूंकडे आत्मविश्वास हवा की ते षटकार लगावू शकतात. आमच्याकाळी खेळाडूंमध्ये या आत्मविश्वासाची कमी होती. १५वर्षाच्या मुलाकडे एवढे षटकार खेचण्याची ताकद नसेल पण त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे मोठ्या आकाराच्या बॅट्स आहेत. त्यांना टायमिंगची देणगी लाभली आहे. मोठे षटकार लगावण्यासाठी तुम्ही ख्रिस गेल असणं गरजेचं नाही. तंत्रज्ञानाच्या साह्याने बॅट अधिकाअधिक ताकदवान झाल्या आहेत.
शरीराचं संतुलन आवश्यक
गोल्फमध्ये फटका लगावणं तांत्रिक आहे कारण चेंडू स्थिर असतो. मी क्रिकेट आणि गोल्फ दोन्ही खेळलो आहे. शरीराचं संतुलन खूप आवश्यक असतं. जेव्हा तुम्ही मोठा फटका लगावता तेव्हा तुमचं शरीर तय्यार असणं आवश्यक असतं. काही खेळाडू कव्हर क्षेत्रात फटका मारतात तेव्हा त्यांचे पाय हवेत असतात. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर अगदी सहजतेने हे फटके खेळतात. कारण त्यांचं शरीर अत्यंत संतुलित स्थितीत असतं. क्रिकेटपटू असो किंवा गोल्फर- दोघांसाठीही शरीराचा बेस ठोस असणं महत्त्वाचं. पदलालित्य सुसंगत असेल तर कंबर,खांदे, हात हे सगळं एकासुरात काम करतात. काही खेळाडूंचा आर्मस्विंग मोठा असतो. काहींचा बॉडी स्विंग मोठा असतो. यशस्वी जैस्वालकडे फुल बॉडीस्विंग आहे.
क्रिकेटमध्ये फॉलोथ्रू आवश्यक नाही
क्रिकेट आणि गोल्फमध्ये फॉलो थ्रू आवश्यक असतो पण काही फलंदाज फॉलोथ्रूविनाच खणखणीत षटकार चोपतात. युवराज सिंग दोन पद्धतीने फटके मारायचा. एका पद्धतीनुसार फटका मारल्यानंतर त्याची बॅट थांबायची. दुसऱ्या प्रकारात फटका लगावल्यानंतर बॅटचा पूर्ण फॉलो थ्रू पाहायला मिळायचा. तुमची कंबर, शरीर आणि खांदे एकासुरात असतील तर मोठ्या स्नायूंवर नियंत्रण ठेवणं सोपं असतं. कोपराकडचा भाग छोट्या स्नायूंचा असतो. गोल्फमध्ये पूर्ण स्विंग आवश्यक असतो, त्याहीपेक्षा पॉइंट ऑफ इम्पॅक्ट आणखी महत्त्वाचा असतो.
हात-डोळ्यांमधला समन्वय
क्रिकेट आणि गोल्फ दोन वेगळे खेळ आहेत. पण दोन्हीमध्ये हँडआय म्हणजेच हात आणि डोळे यांच्यातील समन्वयाचा कस लागतो. अनेक वर्ष क्रिकेट खेळून तुमचं हँडआय कोऑर्डिनेशन चांगलं होतं. तुम्ही दारा सिंग यांच्यासारखे ताकदवान असायची आवश्यकता नाही. हार्दिक पंड्या फटका मारतो तेव्हा तुम्हाला कळतं की हा षटकार जाणार. त्याच्याकडे पुरेशी ताकद आहे आणि हँडआय कोऑर्डिनेशन उत्तम आहे.
स्विंग- हॉकीतला मुद्दा
हॉकीपटू जेव्हा फटका लगावतात तेव्हाचा स्विंग गोल्फशी साधर्म्य साधणारा असतो. कारण हॉकीमधला चेंडूही गोल्फप्रमाणे जमिनीवर असतो.
क्रिकेटपटूंना फायदे
क्रिकेट खेळलं थांबवल्यावर मी गोल्फ खेळायला सुरुवात केली. पण जुन्या जमान्यातले खेळाडूही गोल्फ खेळायचे. गॅरी सोबर्स जेव्हाही मोकळा वेळ मिळायचा तेव्हा गोल्फ खेळायचे. सर डोनाल्ड ब्रॅडमॅनही गोल्फ खेळायचे. भारतीय कधी गोल्फ खेळायचे नाहीत. का ते मला माहिती नाही. आपल्याला एखाद्या खोलीत बसायला आवडतं, बैठी जीवनशैली आवडते. गोल्फ खेळणं क्रिकेटपटूंना अतिशय उपयुक्त ठरू शकतं. क्रिकेट खेळत असतानाच मी गोल्फ खेळत असतो तर माझ्या नावावर आणखी २००० धावा असत्या. कारण गोल्फमुळे तुमचं चित्त एकाग्र व्हायला मदत होते. समन्वय आणि टायमिंग सुधारतं. गोल्फने मला किती आनंद दिला आहे याचं वर्णन करायला मला शब्द अपुरे पडतील.
गोल्फ खेळणाऱ्या क्रिकेटपटूंपुढची आव्हान
अचूकतेने दूरवर फटका मारणं हे गोल्फमधलं आव्हान आहे. गोल्फमध्ये लक्ष्य खूप छोटंसं असतं आणि तुम्हाला लक्ष्याच्या दिशेने मारायचं असतं. तुमच्या शरीरात ठहराव लागतो. हँडआय कोऑर्डिनेशन उत्तम लागतं. स्विंग दमदार असेल आणि टायमिंग असेल तर तुम्हाला गोल्फ जमू शकतं. पण जिथे मारायचं आहे ते साधणं कठीण असतं. क्रिकेटमध्ये तुम्ही कुठेही फटकेबाजी करू शकता. कव्हरमध्ये नाही तर मिडऑफ क्षेत्रात मारू शकता. गोल्फमध्ये ३६० डिग्री फटकेबाजी करू शकत नाहीत. तुम्हाला अचूक मारावं लागतं
क्रिकेटपटूंची बॅट जड असते, गोल्फमध्ये हलकी स्टिक
वेगवेगळ्या वजनाच्या बॅटशी जुळवून घेणंही एक आव्हान आहे पण अशक्य नाही. काहीजण इंग्रजीत लिहू शकतात काही हिंदीत. काही चांगलं गाऊ शकतात. मग ते रॉक असो किंवा शास्त्रीय संगीत. काहीजण वेगवेगळे खेळ खेळू शकतात. तुमच्या नैसर्गिक क्षमतेवर ते अवलंबून असतं. तुम्ही भारतासाठी क्रिकेट खेळले आहात म्हणजे गोल्फही तितकंच उत्तम खेळू शकाल असं नाही.
