वृत्तसंस्था, मुंबई : श्रीलंकेविरुद्ध शनिवारपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या वारंवार होणार्‍या दुखापतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारताला या महत्त्वाच्या मालिकेत नियमित खेळाडू जसप्रीत बुमरा, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याविना खेळावे लागणार आहे. विशेषत: वेगवान गोलंदाजांना सतत होणार्‍या दुखापती चिंताजनक असल्याचे मत माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले असून यामागे विश्रांतीचा अभाव हेच मुख्य कारण असल्याचे ते म्हणाले.

बुमरा आणि सुदर्शन यांचा सुरुवातीला संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यांची अंतिम निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचे निवड समितीने स्पष्ट केले होते. ‘बीसीसीआय’च्या बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलंसमधील (सीओई) डॉक्टरांकडून त्यांना खेळण्याची परवानगी न मिळाल्याने दोघांनाही अखेर मालिकेतून माघार घ्यावी लागली. महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी दोन प्रमुख खेळाडूंची अनुपलब्धता ही भारतीय संघासाठी मोठी चिंता मानली जात आहे. तसेच हर्षित राणा, हार्दिक पंड्या, नितीश रेड्डी यांसारखे वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलूही वारंवार जायबंदी होत असल्याने ‘सीओई’वर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता माजी अष्टपैलू आणि विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

‘‘देशांतर्गत क्रिकेट खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक खेळाडूने स्वत:च्या शरीराची क्षमता आणि त्यावर होणारा परिणाम समजून घेतला पाहिजे. सध्या ट्वेन्टी-२० सामन्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याचा शरीरावर किती परिणाम होतो, याबाबत प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: वेगवान गोलंदाजांचे शरीर सततच्या अशा भारासाठी नैसर्गिकरीत्या तयार झालेले नसते. मानवी शरीर फलंदाजीसाठी अधिक अनुकूल आहे. वेगवान गोलंदाजी करताना त्यावर मोठा ताण येतो. त्यामुळे वेगवान गोलंदाजांचे कार्यभार व्यवस्थापन, त्यांची विश्रांती याबाबत ‘बीसीसीआय’ने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे,’’ असे कपिल म्हणाले.

फिरकीविरुद्धच्या कौशल्यासाठी देशांतर्गत क्रिकेट महत्त्वाचे

’ गेल्या काही काळात भारतीय फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसत आहेत. घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला अपशेल अपयशाचा सामना करावा लागला. या मालिकांत भारतीय फलंदाजांच्या फिरकीविरुद्धच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.’ कपिल देव यांनी थेट देशांतर्गत क्रिकेटशी त्याचा संबंध जोडला. ‘‘भारतीय संघाला फिरकीविरुद्ध अडचणी येतात, याचे एक कारण म्हणजे आघाडीचे खेळाडू पुरेसे देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत. ‘बीसीसीआय’ने याबाबत ठाम भूमिका घेत सर्व खेळाडूंना बहुदिवसीय देशांतर्गत सामने खेळण्यास भाग पाडले पाहिजे,’’ असे ते म्हणाले.’ देशांतर्गत क्रिकेटमुळे केवळ आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच फायदा होणार नाही, तर युवा खेळाडूंनाही त्यांच्यासह खेळण्याची आणि शिकण्याची संधी मिळेल, असे कपिल यांनी नमूद केले. ‘‘ही प्रक्रिया भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठीही महत्त्वाची आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

वॉशिंग्टनबाबत अनिश्चितता

भारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे. पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे वॉशिंग्टनला १५ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीत खेळता येणार नाही. परंतु २३ ऑगस्टपासून रंगणार्‍या दुसर्‍या कसोटीसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, अलीकडेच खेळाडूंना तंदुरुस्त घोषित केल्यानंतर ते पुन्हा जायबंदी झाल्याची काही प्रकरणे भारतीय क्रिकेटमध्ये घडली होती. त्यामुळे वॉशिंग्टनबाबत कोणतीही घाई करण्यास ‘सीओई’ आणि संघ व्यवस्थापन तयार नसल्याची माहिती आहे.