Kapil Dev Speaks On Virat KohliL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. विराटने या सामन्यात १३५ धावांची नाबाद शतकी खेळी साकारली आणि भारताला पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवून दिला. विराट कोहलीचा वेगळाच अंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. षटकारांची आतिषबाजी करत विराटने ही खेळी साकारली. टी-२० व कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट फक्त एकदिवसीय सामने खेळत आहे. यादरम्यान विराट कोहलीबाबत भारताचे माजी खेळाडू कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी विराट कोहलीने आणखी काही काळ कसोटी क्रिकेट खेळायला हवं होतं, असं मत व्यक्त केलं आहे. विराटच्या फलंदाजीचे चाहते असलेल्या कपिल देव यांनी त्याच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाबद्दल दुःख व्यक्त केलं. तसेच, विराटने आणखी २-३ वर्षे वनडे क्रिकेट खेळत राहून अनेक विक्रम आपल्या नावावर करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
PTIशी संवाद साधताना कपिल देव म्हणाले, “तो ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता तो अजूनही चांगल्या फॉर्ममध्ये दिसतो. या वयात त्याचा फिटनेस सर्वात महत्त्वाचा आहे. जर त्याने आणखी दोन-तीन वर्षं स्वतःला फिट ठेवलं, तर तो अनेक विक्रम मोडू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे, त्याने कसोटीमधून निवृत्ती घेतल्याचं पाहून मला वाईट वाटलं. त्याने कसोटीतून निवृत्ती का घेतली, हे मला माहिती नाही.”
ते पुढे म्हणाले, “त्याला स्वतःला याबद्दल सर्वात चांगलं माहिती असेल. पण एक प्रेक्षक आणि माजी क्रिकेटपटू म्हणून मला वाटतं की त्याने आणखी कसोटी क्रिकेट खेळायला हवं होतं, कारण त्याच्यात ती क्षमता आहे. नक्कीच आहे. त्याचा खेळ आवडणारी व्यक्ती आणि खेळाचं आकलन असलेला माणूस म्हणून मला हे स्पष्टपणे वाटतं. आज त्याला स्वतःला या निर्णयाबद्दल वाईट वाटतंय की नाही, हे मला माहिती नाही.”
कपिल देव यांनी पुढे असंही म्हटलं की, काही वर्षांनी विराट कोहलीला आपल्या कसोटी निवृत्तीच्या निर्णयाचा पश्चात्ताप होऊ शकतो आणि त्याने आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळायला हवं होतं, असं त्याला वाटू शकतं. कपिल देव म्हणाले, “त्याने खेळणं थांबवलं आहे. पण मला वाटतं, काही वर्षांनी त्याला नक्कीच वाटू शकतं की आपण आणखी थोडं कसोटी क्रिकेट का खेळलो नाही? जेव्हा तुमचं खेळावर प्रेम असतं, खेळाची आवड असते, तेव्हा स्वतःला व्यवस्थित सांभाळता येत असेल तर निवृत्ती का घ्यायची? टी-२० क्रिकेट पूर्णपणे वेगळं असू शकतं, हे मला समजतं. पण एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट ही त्याच्या खेळाची ताकद आहे.”
ते पुढे म्हणाले, “माझ्या मते तो ३७-३८ वर्षांचा आहे आणि क्रिकेटच्या दृष्टीने तो आता खूप अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे माझ्यासारख्या लोकांनी त्याला सल्ला देणं योग्य नाही. त्याच्यासाठी काय चांगलं आहे, हे त्याला सर्वात चांगलं माहिती आहे. बाहेरून पाहताना मला फक्त एवढंच वाटतं की त्याने आणखी थोडं खेळायला हवं होतं. त्याने निवृत्ती मागे घ्यावी असंही वाटतं. पण नाही, आपल्यासारख्या लोकांनी तसंही म्हणू नये. तो त्याचा निर्णय आहे, आपला नाही.”
