नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला असला, तरी नशिबावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे मला त्यांना पसंतिक्रम द्यायचा नाही, असे मत भारतीय विश्वचषक विजेत्या संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सांगितले.
आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीनंतर कपिल देव यांना विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या आशांबद्दल विचारले असता, त्यांनी प्रथम पहिल्या चार जणांत स्थान मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर सगळे नशिबावर अवलंबून असते, असे सांगितले. ‘‘विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत आहे, असे म्हणता येणार नाही. भारतीय संघ निश्चितपणे चांगला आहे; पण मन काही वेगळेच मानत आहे. आपल्याला अजून तयारी करण्याची गरज आहे. आपल्या संघाबद्दल मला कल्पना आहे. अन्य संघाच्या ताकदीबद्दल मला अजून कल्पना नाही. त्यामुळे विजेतेपदाची किती संधी यावर आंधळेपणाने बोलणे योग्य ठरणार नाही,’’ असे कपिल देव म्हणाले.




हेही वाचा >>>World Cup 2023: ‘दिल कुछ कहता है और दिमाग…’; भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या प्रश्नावर कपिल देव यांचे वक्तव्य
‘‘भारतीय संघ विश्वचषक खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सज्ज आहे, असे फार तर म्हणता येईल. आशिया चषक जिंकून त्यांनी तयारीची चुणूक दाखवली आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कटतेने खेळावे आणि खेळाचा आनंद घ्यावा,’’ असेही कपिल यांनी सांगितले. विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व खेळाडू तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. कारण एखादा खेळाडू जरी जखमी झाला, तरी संघाचा समतोल बिघडतो, असे सांगताना कपिलदेव यांनी मोठय़ा स्पर्धेसाठी तंदुरुस्तीचे महत्त्व दाखवून दिले.
सिराजची गोलंदाजी बघणे हा सुखद धक्का होता. एक काळ असा होता की, भारतीय संघ केवळ फिरकी गोलंदाजांवर अवलंबून असायचा; पण आता चित्र बदलले आहे आणि त्यामुळेच संघाची ताकद वाढली आहे. – कपिल देव