Karn Sharma Announces Retirement From All Formats Of Cricket: भारतीय संघाकडून, आयपीएलमध्ये व देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या भारताच्या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३८ वर्षीय कर्ण शर्माने युपी टी-२० लीगमध्ये खेळताना निवृत्तीची घोषणा केली. कर्ण शर्माने २०१४ मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. याशिवाय आयपीएलमध्ये तो खेळताना दिसला आहे. आयपीएल २०२५ मध्ये कर्ण शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता.

भारतासाठी चार आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला ३८ वर्षीय लेग-स्पिनर कर्ण शर्मा याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने भारतासाठी आपला शेवटचा सामना २०१४ मध्ये खेळला होता आणि त्यानंतर त्याला भारतीय संघाचा भाग होण्याची पुन्हा संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांसारख्या प्रमुख संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या (ESPN Cricinfo) वृत्तानुसार, कर्ण शर्मा २५ ऑगस्ट रोजी आपल्या संघासाठी शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर तो क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार आहे. आपल्या निर्णयाबाबत बोलताना कर्ण शर्मा म्हणाला, “मला आता निवृत्ती घ्यायची आहे. माझं कुटुंब, बीसीसीआय (BCCI), रेल्वे, यूपीसीए (UPCA), आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचा मी अत्यंत ऋणी आहे. यापुढे मी प्रशिक्षकपद आणि क्रिकेटशी संबंधित इतर जबाबदाऱ्यांसाठी उपलब्ध असेन.”

कर्ण शर्माने भारतासाठी एकूण चार आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि एका टी-२० सामन्याचा समावेश होता. त्याने एकूण पाच बळी घेतले; यात कसोटी सामन्यांमधील चार आणि टी-२० सामन्यांमधील एका बळीचा समावेश आहे. त्याला राष्ट्रीय संघाकडून खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्या नसल्या, तरी देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने फर्स्ट-क्लास, लिस्ट ‘ए’ आणि टी-२० अशा विविध प्रकारांत मिळून एकूण ५५१ बळी घेतले. कर्णने ९७ फर्स्ट-क्लास सामन्यांत २७०, १२३ लिस्ट ‘ए’ सामन्यांत १५३ आणि १९१ टी-२० सामन्यांत १६८ बळी घेतले.

कर्ण शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे सलग तीन वर्षांत तीन वेगवेगळ्या संघांकडून खेळताना आयपीएलचं विजेतेपद मिळवणं. त्याने २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद, २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स आणि २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना हे विजेतेपद पटकावलं. २०१८ मध्ये तिसरे विजेतेपद जिंकल्यानंतर, सलग तीन वर्षे वेगवेगळ्या संघांकडून खेळून ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंच्या एका प्रतिष्ठित गटात त्याचा समावेश झाला. त्याने २०२५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी आपला शेवटचा आयपीएल सामना खेळला.