मुंबई : प्रसिध कृष्णा (३/२१), विद्वथ कावेरप्पा (३/३८) आणि श्रेयस गोपाळ (३/४) यांच्या गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटकने रणजी चषक उपांत्यपूर्व फेरीत सर्वाधिक वेळा विजेत्या मुंबईविरुद्ध पहिल्याच दिवशी सामन्यावर घट्ट पकड मिळविली.

प्रमुख फलंदाज सर्फराज खान ताप आल्यामुळे खेळू शकला नाही. मुंबई संघाला सामना सुरू होण्यापूर्वी हा धक्काच होता. त्यानंतर बीकेसीच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मुंबईचा निर्णय बूमरँगसारखा त्यांच्यावरच उलटला. मुंबईचा पहिला डाव ४८.१ षटकांतच १२० धावांत आटोपला. त्यानंतर दिवसअखेरीसच कर्नाटकने २ बाद ११० धावा करताना पहिल्या डावात मोठ्या आघाडीकडे भक्कम पाऊल टाकले. मयांक अगरवाल ५४ धावांवर खेळत होता.

मुंबईच्या डावाची सुरुवातच खराब झाली. पहिल्या चौदा षटकांतच मुंबईने यशस्वी जैस्वाल (५), मुशीर खान (१) आणि सिद्धेश लाडला (१२) गमावले. मुंबईची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली होती. सलामीचा फलंदाज अखिल हेरवाडकरने १३८ चेंडूंत एक बाजू लावून धरताना केलेली संयमी ६० धावांची खेळी मुंबईसाठी दिलासा देणारी ठरली. संघाच्या एकूण धावसंख्येच्या निम्म्या धावा त्याने एकट्यानेच काढल्या. दुसऱ्या बाजूने हेरवाडकरला साथ मिळाली नाही. मुंबईने अखेरचे सात फलंदाज ५० धावांत गमावले.

मुंबईला झटपट गुंडाळल्यानंतर केएल राहुल (२८) आणि मयांक अगरवाल यांनी कर्नाटकला वेगवान सुरुवात करून दिली. पाच षटकातंच त्यांनी ३३ धावांची मजल मारली होती. या दोघांनी शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. राहुलची आक्रमकता मात्र फार काळ टिकू शकली नाही. राहुलपाठोपाठ लयीत असलेल्या देवदत्त पडिक्कलला (१७) झटपट बाद करण्यात मुंबईला यश आले. आता मयांक, करुण नायर आणि अन्य फलंदाज कर्नाटकची आघाडी किती वाढवतात यावर त्यांचा निर्णायक विजय अवलंबून असेल. खेळ थांबला तेव्हा मयांकच्या साथीत करुण नायर ३ धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक :

मुंबई (पहिला डाव) : ४८.१ षटकांत सर्व बाद १२० (अखिल हेरवाडकर ६०; प्रसिध कृष्णा ३/२१, श्रेयस गोपाल ३/४, विद्वथ कावेरप्पा ३/३८)

कर्नाटक (पहिला डाव) : २६ षटकांत २ बाद ११० (मयांक अगरवाल खेळत आहे ५४, केएल राहुल २८, करुण नायर खेळत आहे ३; सुर्यांश शेडगे १/१६)

अन्य सामन्यात

  • बंगालविरुद्ध आंध्र प्रदेश ६ बाद २६४. बंगालकडून मुकेश कुमारचे तीन, तर आकाश दीपचे दोन बळी
  • उत्तराखंडने जन्मेजय जोशी (४-४६),आदित्य रावत (३-३९), मयांक मिश्रा (३-५०) गोलंदाजीच्या जोरावर झारखंडला २३५ धावांत गुंडाळले.
  • कुलदीप सेनच्या (५-६६) गोलंदाजीच्या जोरावर मध्य प्रदेशने जम्मू-काश्मीरला १९४ धावांत रोखले. मध्य प्रदेशच्या बिनबाद २८ धावा.