कर्नाटककडे आघाडी

बुधवारच्या २ बाद ९९ धावांवरून पुढे खेळताना मुंबईच्या फलंदाजांनी कर्नाटकच्या गोलंदाजांपुढे सपशेल नांगी टाकली

(संग्रहित छायाचित्र)

रणजी करंडक  क्रिकेट स्पर्धा

मुंबईचा २०५ धावांत खुर्दा; रोनितचे पाच बळी

वेगवान गोलंदाज रोनित मोरेने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर कर्नाटकने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटातील दुसऱ्या साखळी लढतीत मुंबईचा पहिला डाव २०५ धावांवर संपुष्टात आणला. यामुळे कर्नाटकने तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ८१ धावा केल्या आहेत.

बुधवारच्या २ बाद ९९ धावांवरून पुढे खेळताना मुंबईच्या फलंदाजांनी कर्नाटकच्या गोलंदाजांपुढे सपशेल नांगी टाकली. जय बिश्त (७०) वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर फार काळ तग धरू शकला नाही. विशेष म्हणजे मुंबईच्या फलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ सिद्धेश लाड (२२), सूर्यकुमार यादव (१७) व आदित्य तरे (१) यांना रोनितने १० षटकांच्या अंतरात बाद करून मुंबईला संकटात टाकले. शाम्स मुलानीने अखेरीस ३४ धावा केल्यामुळे मुंबईने २०० धावांचा टप्पा ओलांडला. कर्नाटकसाठी रोनितने पाच, तर श्रेयस गोपाळ व प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन गडी गारद केले.

दुसऱ्या डावात मुंबईचा कर्णधार धवल कुलकर्णीने प्रभावी मारा करत सलामीवीरांना १८ धावांतच तंबूत धाडले. मग कृष्णमूर्ती सिद्धार्थने (खेळत आहे ३०) दिवस संपेपर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडले. कर्नाटकच्या खात्यात आता एकूण २७६ धावांची आघाडी जमा आहे.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक (पहिला डाव) : सर्वबाद ४००

मुंबई (पहिला डाव) : ८५.५ षटकांत सर्वबाद २०५ (जय बिश्त ७०, शाम्स मुलानी ३४; रोनित मोरे ५/५२)

कर्नाटक (दुसरा डाव) : ३४ षटकांत ३ बाद ८१ (कृष्णमूर्ती सिद्धार्थ खेळत आहे ३०; धवल कुलकर्णी २/७)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karnataka lead in ranji trophy