Karun Nair scores brilliant century for KSCA Secretary’s XI: सध्या दुलीप करंडक २०२६ चा अंतिम सामना ईस्ट झोन आणि साऊथ झोन या संघांमध्ये खेळवला जात आहे. या अंतिम सामन्यात ईस्ट झोनच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ७०८ धावांचा डोंगर उभारला आहे. ज्यामध्ये इशान किशनच्या २७० धावांच्या धुव्वाधार खेळीचा मोठा वाटा आहे. आता जर साऊथ झोन संघाला सामन्यात टिकून राहायचं असेल तर धावांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. पण यादरम्यानच संघातून वगळलेल्या करूण नायरने मात्र दुसऱ्या स्पर्धेत सहभागी होत शतकी खेळी साकारली आहे.
सोमवारी ७ सप्टेंबरला बेंगळुरूत झालेल्या डॉ. के. थिमप्पिया मेमोरियल स्पर्धेत छत्तीसगडविरुद्ध ‘केएससीए सेक्रेटरीज इलेव्हन’तर्फे करूण नायर शतकी खेळी साकारली. नायरने हे शतक झळकावून, हे सिद्ध केलं की, दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात ‘साउथ झोन’ला त्याच्या अनुपस्थितीची उणीव भासू शकते.
एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करुणने १८३ चेंडूंत १०४ धावांची खेळी केली; या खेळीत १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असूनही, ‘ईस्ट झोन’विरुद्ध सुरू असलेल्या दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ‘साउथ झोन’च्या संघात त्याला स्थान मिळालं नाही.
दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यातून करूण नायरला का वगळण्यात आलं?
साउथ झोनचे प्रशिक्षक विक्रम वर्मा म्हणाले, “आम्ही एक चांगलं कॉम्बिनेशन निवडलं होतं, कारण प्रत्येक संघात दोन ‘लेफ्ट-आर्म स्पिनर्स’ असतात. त्यामुळे, मधल्या फळीत डाव्या हाताचा फलंदाज असल्यास प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्याची चांगली संधी मिळेल, असं आम्हाला वाटलं. संघाच्या हितासाठी जे सर्वोत्तम होतं, त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं. आता देवदत्त पडिक्कल परतल्यामुळे संघ-रचनेचा प्रश्न निर्माण झाला आहे. करुणला संघाबाहेर ठेवणं खूप कठीण आहे, पण सध्या आमच्याकडे कॉम्बिनेशनसाठी हाच पर्याय आहे.”
करुणने २०२५-२६ च्या रणजी करंडक हंगामात कर्नाटकसाठी ६९९ धावा केल्या होत्या. रविवारी संध्याकाळी तो विमानाने बेंगळुरूला रवाना झाला. वर्मा यांनी करुणच्या अनुपस्थितीचं कारण “वैयक्तिक कारण” असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “तो वैयक्तिक कारणांमुळे घरी परतला आहे. त्याने आम्हाला ईमेल करून कौटुंबिक कारणास्तव प्रवास करण्याची परवानगी मागितली होती.”
मात्र, आपल्या शहरात आयोजित स्पर्धेत करुणने घेतलेला सहभाग हे दर्शवतो की, त्याच्या अनुपस्थितीमागे केवळ ‘वैयक्तिक कारण’ हेच एकमेव कारण नव्हतं. करुणने झळकावलेल्या शतकाच्या बळावर, छत्तीसगडविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ‘सेक्रेटरीज इलेव्हन’ने ९० षटकांत ९ बाद २७७ धावा केल्या. आता साऊथ झोन संघाला त्याच्या संघातील अनुपस्थितीचा किती फटका बसणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
