Karun Nair Comeback In Team India: भारताचा स्टार फलंदाज करुण नायरने १० डिसेंबर २०२२ ला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. ‘डियर क्रिकेट मला एक संधी द्या…’, आता २४ मे २०२५ ला म्हणजे ३ वर्षांनंतर क्रिकेटने करुण नायरला रिप्लाय दिला आहे. ज्या संधीची करुण नायर आतुरतेने वाट पाहत होता, ती संधी त्याला मिळाली आहे. त्रिशतकी खेळी करून संघाबाहेर पडणारा करुण नायर कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

एखाद्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी केल्यानंतर, तो लवकरच यशाचं शिखर गाठणार असं म्हटलं जाऊ लागतं. पण करुण नायरसोबत असं झालं नाही. त्रिशतकी खेळी केल्यानंतर त्याला संघाबाहेर करण्यात आलं. त्यानंतर तो संघात कमबॅक करू शकला नव्हता. मात्र, त्याने जिद्द सोडली नव्हती. त्याने कमबॅक करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी क्रिकेट खेळणं असेल किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणं असेल. त्याने प्रयत्न कुठेच कमी पडले नाहीत.

काउंटी क्रिकेटमध्ये त्याने २०२३ नॉर्थम्टनशायर मध्ये संघाकडून फलंदाजी करताना ३ सामन्यांमध्ये ८३ च्या दमदार सरासरीने २४९ धावा केल्या. यादरम्यान त्याने दमदार शतकी खेळी केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०२४ मध्ये त्याने ४९ च्या सरासरीने ४८७ धावा कुटल्या.

कर्नाटक सोडून विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय

करुण नायरने कर्नाटक संघाची साथ सोडून विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. विदर्भाला एका अनुभवी खेळाडूची गरज होती. त्याने विदर्भाकडून खेळताना १० सामन्यांमध्ये २ शतकं आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने ६९० धावा केल्या. २०२४–२५ हंगामात त्याने ५४ च्या सरासरीने ८६३ धावा कुटल्या. रणजी ट्रॉफीत धुमाकूळ घातल्यानंतर विजय हजारे ट्रॉफीतही त्याची बॅट चांगलीच तळपली. या स्पर्धेत त्याने ७७९ धावा केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काउंटी, रणजी आणि विजय हजारे ट्रॉफित धावांचा पाऊस पाडल्यानंतर आयपीएल स्पर्धेतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. दिल्लीकडून त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत तो पहिल्याच सामन्यात शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र त्याचं शतक थोडक्यात हुकलं. या खेळीसह त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी दार ठोकलं. अखेर बीसीसीआयने त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान दिलं आहे. आता इंग्लंड दौऱ्यावर तो कशी कामगिरी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.