आयपीएलमुळे अनेक छोटी शहरे, गावांमधून अनेक चांगले, टॅलेंटेड खेळाडू समोर आले आहेत. आयपीएलच्या निमित्ताने त्यांनाही आपली प्रतिभा दाखवण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार मंजूर दार (२४) अशाच खेळाडूंपैकी एक आहे. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील दुर्गम गावात राहणार मंजूर दार यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पंजाबने त्याला बेस प्राईसला म्हणजे २० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूर हा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू-काश्मीरच्या एकमेव खेळाडू आहे. त्याच्याआधी जम्मू-काश्मीरचा कर्णधार परवेझ रसूल आयपीएलमधून खेळला आहे.

मंजूरचे वैशिष्टय म्हणजे प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन तो इथपर्यंत पोहोचला आहे. घरची परिस्थिती गरिबीची असूनही फक्त क्रिकेटच्या आवडीमुळे आज हा दिवस पाहू शकलो असे त्याने सांगितले. आठ भावडांमध्ये सर्वात मोठा असलेल्या मंजूरवर घरची जबाबदारी आहे. चार बहिणी आणि तीन भाऊ असा त्याचा परिवार आहे.

खेळावर लक्ष केंद्रीत करतानाच माझ्यावर कुटुंबाचीही जबाबदारी होती. बेताच्या परिस्थितीमुळे मला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले असे भावनिक झालेल्या मंजूरने सांगितले. मागच्यावर्षी उत्तर विभागाच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने जम्मू-काश्मीरकडून पदार्पण केले. त्यानंतर मंजूरने मागे वळून पाहिलेले नाही.

मंजूरला स्थानिक संघाकडून पहिली संधी मिळाली त्यावेळी त्याने पहिल्याच सामन्यात आठ षटकरांसह शतक ठोकले. श्रीनगरमध्ये पहिला सामना खेळताना त्याच्याकडे स्वत:चे बूटही नव्हते. कारण बूट विकत घेण्यासारखी माझी परिस्थिती नव्हती. परिस्थितीमुळे माझ्या कुटुंबाला अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागले आहे असे मंजूर दारने सांगितले. दिवसा क्रिकेट खेळायला मिळावे यासाठी मंजूरने रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षकाची नोकरी सुद्धा केली आहे. आता सर्व काही चांगले घडेल अशी मंजूरला अपेक्षा आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मोहालीमधील कॅम्पमध्ये सहभागी होण्याआधी त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली.