Sunrisers Leeds X Account Suspend: आयपीएल २०२६ पूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकिण काव्या मारन वादात अडकली आहे. इंग्लंडच्या “द हंड्रेड” लीगमधील सनरायझर्स ग्रुप फ्रँचायझीने एका पाकिस्तानी खेळाडूला लिलावत संघात सामील केलं आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला. पहिल्यांदाच, “द हंड्रेड” मध्ये लिलाव पार पडला, जिथे सनरायझर्स लीड्सने पुरुषांच्या स्पर्धेसाठी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला मोठ्या रकमेला खरेदी केलं. यानंतर काव्या मारन आणि सनरायझर्स फ्रँचायझीला मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. यादरम्यान आता संघाचं सोशल मीडिया अकाऊंट सस्पेंड केलं आहे.
सनरायझर्स फ्रँचायझीची मालकिण काव्या मारनला तीव्र टीकेला सामोरं जावं लागत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, सनरायझर्स लीड्सचे सोशल मीडिया अकाउंट अचानक निलंबित करण्यात आले आहेत, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
द हंड्रेड पुरुष स्पर्धेसाठी पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव गुरुवारी, १२ मार्च रोजी इंग्लंडमध्ये झाला. पाकिस्तानी लेग-स्पिनर अबरार अहमदला सनरायझर्स लीड्सने अंदाजे २.३ कोटी रूपये किंमत मोजत संघात सामील केलं. यावेळी काव्या मारन देखील तिच्या फ्रँचायझीसोबत लिलावाच्या टेबलावर बसली होती आणि संघाने हा निर्णय घेताच, सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.
पाकिस्तानी खेळाडूला संघात घेतल्याने काव्या मारन ट्रोल
लिलावापासून काव्या मारन आणि तिच्या फ्रँचायझीवर बरीच टीका झाली आहे. यादरम्यान, फ्रँचायझीचे सोशल मीडिया अकाउंट अचानक निलंबित करण्यात आले आहेत. लिलावात अबरारच्या खरेदीवरून वाद सुरू झाल्यानंतर काही तासांतच, सनरायझर्स लीड्सचे ‘एक्स’ अकाऊंट निलंबित करण्यात आले. फ्रँचायझीच्या अकाऊंटमध्ये असं म्हटलं आहे की ते एक्सच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं आहे. पण, कोणत्या नियमाचे उल्लंघन झाले आणि अकाऊंट का निलंबित करण्यात आले हे सध्या स्पष्ट झालेलं नाही.
लिलावापूर्वी सर्वांचे लक्ष स्पर्धेतील चार भारतीय मालकीचे संघ पाकिस्तानी खेळाडू खरेदी करतील का याकडे होते. हा प्रश्न एका रिपोर्ट्समुळे निर्माण झाला, कारण चार भारतीय मालकीच्या आयपीएल फ्रँचायझी पाकिस्तानी खेळाडू खरेदी करणार नाहीत असा दावा एका अहवालात करण्यात आला होता. यानंतर, ईसीबीने सर्व फ्रँचायझींशी सल्लामसलत करून एक निवेदन जारी केले की ते खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या आधारावर नव्हे तर त्यांच्या क्षमतेच्या आधारावर खरेदी करतील.
द हंड्रेड स्पर्धेच्या लिलावात १३ पाकिस्तानी खेळाडूंनी भाग घेतला. यापैकी अबरार व्यतिरिक्त, फक्त फिरकी गोलंदाज उस्मान तारिकला खरेदी करण्यात आलं. त्याला बर्मिंगहॅम फिनिक्सने आपल्या संघात सामील केलं.
