भारताचे माजी यष्टीरक्षक आणि स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी प्रशिक्षक अशी ओळख असलेल्या चंद्रकांत पंडीत यांनी केदार जाधवचं कौतुक केलं आहे. आगामी ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत केदारची भूमिका महत्वाची असेल असं पंडीत म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील संघात चंद्रकांत पंडीत यांनी याआधी केदार जाधवला प्रशिक्षण दिलं आहे.

“केदार गुणवान खेळाडू आहे, गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. कर्णधार विराट कोहली त्याचा फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीसाठीही वापर करतो. त्यामुळे आगामी स्पर्धेत केदार जाधवची भूमिका महत्वाची असणार आहे.” पंडीत पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. फलंदाजीमध्ये केदार जाधव पाचव्या किंव्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी योग्य असल्याचंही पंडीत म्हणाले आहेत.

यावेळी पंडीत यांनी भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं आहे. आयपीएलचा हंगाम आटोपल्यानंतर विश्वचषक स्पर्धा ही प्रत्येक खेळाडूसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र ज्या पद्धतीने भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे ते पाहता, यावेळी भारताला विजयाची संधी आहे असं म्हणावं लागेल. विश्वचषकात भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.